चित्रपटाचे नाव हे त्या चित्रपटाचा महत्वाचा भाग असते. ‘आराधना’ म्हणताच राजेश खन्ना- शर्मिला टागोर पटकन डोळ्यासमोर येणारच. ‘जय संतोषी माँ’ देखिल आपले सामाजिक पौराणिक व्यक्तिमत्व घेऊनच आठवतो. पटकथेनुसार चित्रपटाचे नाव असावे ही या माध्यमाची गरज. काही फिल्मवाल्यांची मात्र अमुकच एखाद्या आद्याक्षराने आपल्या चित्रपटाचे नाव असावे यावर श्रध्दा. शक्ती सामंता, मोहनकुमार, जे. ओमप्रकाश याना ‘ए’ प्रिय तर राकेश रोशनला ‘के’.

याची अन्य एक बाजू म्हणजे सेन्सॉरने चित्रपटाच्या नावाला आक्षेप घेणे. ‘पद्मावती’ हे त्याचे ताजे उदाहरण. चित्रपटाला असलेल्या तीव्र विरोधाची धार कमी करण्याचा मार्ग वा प्रयत्न म्हणून चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करण्याचा सेन्सॉरने सल्ला दिला. या नावाने आपण त्या चित्रपटाशी जोडले जाणे म्हणजे एक प्रकारची सांस्कृतिक तडजोडच! ‘मुगल-ए-आझम’, ‘मदर इंडिया’, ‘ बॉबी’, ‘शोले ‘ अशा अनेक चित्रपटांशी रसिकांच्या अनेक पिढ्या जोडल्या गेल्यात. ‘गाईड’, ‘ज्वेल थीफ’, ‘अभिमान’ असे अनेक चित्रपट त्यांच्या नावांसह त्यांची वैशिष्ट्य सांगत पुढील पिढीत पोहचलेत. सेन्सॉरने या नावाना आक्षेप घेतला नाही हे आता महत्त्वाचे वाटतयं ना?

चित्रपटाचे नाव ‘इम्पात’ (निर्मात्यांची संस्था) नोंदवण्याचा नियम असला तरी सेन्सॉर बोर्डही त्या नावाला आक्षेप घेऊ शकते. हे अगदी इंग्रजांच्या काळापासून चालत आले आहे. ‘किचकवध’ चित्रपट आपल्या विरोधात सामाजिक जागृती करण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे इंग्रज सरकारला वाटल्याने तात्कालिक सेन्सॉरने ते बदलायला लावले व त्याचे ‘सैरंन्ध्री’ झाले. १९५२ सालापासून स्वातंत्र्योत्तर सेन्सॉर बोर्ड आले व चित्रपटाच्या नावातील बदलाचा सेन्सॉरचा हक्क कायम राहिला. पण त्याचा वापर करण्याची गरज खूप उशिरा आली. दिग्दर्शक रामानंद सागर यांचा ‘चरस’ (१९७६) ऐन आणीबाणीत आला. तेव्हा या नावाला आक्षेप घेतला जाताच सागर यानी, ‘चरस’ नावाने पूर्वप्रसिध्दी झाल्याचे सेन्सॉरच्या निदर्शनास आणून देण्यात यश मिळवून ‘चरस’ नाव कायम ठेवले. दिग्दर्शक दासरी नारायणराव यांनाही ‘आज का एमएलए’ (१९८४) नावाच्या जोडीला रामअवतार असे लावावे लागले. ‘रामअवतार’ नावाचाही चित्रपट होताच. सेन्सॉरनेच चित्रपटाच्या नावालाच आक्षेप घेण्याच्या परंपरेत संजय लीला भन्साळीलाही ‘राम लीला’ नावाच्या अगोदर ‘गलियों की रासलीला’ असे लावावे लागलेच. पण चित्रपट ‘राम लीला’ म्हणूनच ओळखला जातो. या सार्‍यात आय. एस. जोहर दिग्दर्शित ‘जोय बांगला देश’ (१९७२) या चित्रपटाचे उदाहरण वेगळेच. सेन्सॉर या नावाला मान्यता देणे शक्यच नव्हते. जोहरने ते बदलून ‘आगे बढो’ केले. पण चित्रपट ‘जोय बांगला देश’ याच नावाने प्रदर्शित केला. सेन्सॉरने चित्रपटाच्या नावालाच आक्षेप घेण्याची ही काही उदाहरणे.

चित्रपटाच्या नावातील बदलाचे आणखीन काही रंग आहेत. काही चित्रपटांची नावे काही वेगळ्याच कारणास्तव बदलावी लागलीत. संजय दत्त व रति अग्निहोत्रीच्या ‘जॉनी’ (१९८३) नावाला निर्माते गुलशन रॉय यांनी हरकत घेताना आपला ‘जॉनी मेरा नाम’ (१९७०) सर्वकालीन बहुचर्चित चित्रपट आहे असा मुद्दा पुढे केला. म्हणून ते ‘जॉनी आय लव्ह यू’ केले. धर्मेंद्रने आपला पुत्र बॉबी देओलला ‘बरसात’ चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात आणताना आर. के. फिल्मची परवानगी घेणे आवश्यक ठरवले व रणधीर कपूरकडून ती मिळवल्याची चर्चा खूप रंगली. अमिताभ बच्चन व हेमा मालिनीची भूमिका असणारा ‘ नास्तिक’ काही वर्षांनी ‘अधर्मी ‘ नावाने प्रदर्शित झाला. पण असा बदल सेन्सॉर संमतीने होत नाही. तर चित्रपटाचा वितरकच तसा निर्णय घेतो. ऋषि कपूर व वर्षा उसगावकार जोडीचा ‘हनिमून’ म्हणूनच तर उत्तर भारतात ‘सुहाग रात’ नावाने झळकला.

राजदत्त दिग्दर्शित ‘पुढचं पाऊल’ या मराठी चित्रपटाचे उदाहरण द्यायलाच हवे. तीस वर्षांपूर्वी विभागवार चित्रपट प्रदर्शित होत. मुंबई-पुणे अशा शहरात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात एकेक छोट्या शहरात तो प्रदर्शित होत होता. त्याला रिस्पॉन्स कसा आहे हे जाणून घेण्यासाठी या चित्रपटाचे एक निर्माते विनय नेवाळकर यानी एका छोट्या थिएटरला भेट देताच त्याना बसलेला धक्का ते आजही रंगवून सांगतात. ‘पुढचं पाऊल’ हे नाव स्थानिक प्रेक्षकांना समजणार नाही असे समजून त्या थियेटरवाल्याने ते बदलून ‘सासूबाई मला मारु नका’ असे केले होते.

चित्रपटाच्या नावावरची सेन्सॉरशिप अशी बहुरंगी आहे. कधी कधी प्रेक्षकही चित्रपटाच्या नावात बदल करतात. धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती यांची भूमिका असणारा ‘जागीर’ नावाचा चित्रपट होता. तो न आवडल्याने फर्स्ट डे फर्स्ट शो संपताच प्रेक्षकांनी त्याचे नाव ‘जा गीर’ असे ठेवले.
दिलीप ठाकूर