चीनपासून फैलाव झालेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगाला त्रस्त केलं आहे. भारतासह अनेक देशांमध्ये या विषाणूने शिरकाव केला आहे. त्यामुळे प्रत्येक देशाने चीनप्रती नाराजी व्यक्त केली असून काही देशांनी चीनच्या मालावर बहिष्कारही टाकला आहे. त्यामुळे ‘केंद्र सरकारनेदेखील चीनी मालावर बहिष्कार टाकावा’, अशी मागणी देशभरातून होत आहे. यामध्येच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अनुप सोनीने ट्विट करुन, ‘अजूनही चीनमधून सामानाची आयात का होते?’ असा प्रश्न केंद्र सरकारला विचारला आहे.

“मला एक गोष्ट कळत नाही. देशभरातून चीनवर आणि चीनी मालावर बहिष्कार टाका ही मागणी जोर धरत आहे. मात्र तरीदेखील सरकार अजून सुद्धा चीनकडून मोठ्या प्रमाणावर पीपीई, मास्क आणि व्हेंटिलेटर सारख्या साधनांची खरेदी करत आहे…हे प्रकरण काही लक्षात येत नाही”, असा प्रश्न अनुप सोनीने विचारला आहे.

दरम्यान, करोना विषाणूने देशात चांगलेच पाय पसरले आहेत. आतापर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली आहे. तर काहींचा या विषाणूमुळे मृत्यूदेखील झाला आहे. त्यामुळे सध्या देशभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यात चीनमुळे या विषाणूचा फैलाव वाढल्यामुळे जगभरात चीनवर कडाडून टीका करण्यात येत आहे.