अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे बिग बी अमिताभ बच्चन सध्या फेसबुकवर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन फेसबुकवर नाराजी व्यक्त करणारं एक ट्विट केलं आहे.
‘हॅलो फेसबुक…माझं फेसबुक पेज नीट सुरु होत नाहीये. हे गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे आता शेवटी मला तक्रार करण्यासाठी या माध्यमाचा वापर करावा लागत आहे’, असं म्हणत त्यांनी या ट्विटमधून नाराजी व्यक्त केली.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अमिताभ बच्चन यांचे ट्विटर आणि फेसबुकवर करोडोंच्या घरात फॉलोअर्स आहेत. रोजच्या आयुष्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांनाही समाविष्ट करुन घेतलं आहे. याशिवाय विविध विषयांवर ते ब्लॉग लिहूनही त्यांचे विचार मांडतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांमध्ये बिग बींचं नाव अग्रस्थानी आहे हेच खरं. कलाविश्वापासून अगदी ते देशाच्या राजकीय पटलावर सुरु असणाऱ्या महत्त्वाच्या विषयांवरही ते आपली प्रतिक्रिया मांडत असतात. त्यामुळे या अनोख्या मार्गाने प्रेक्षकांसोबत जोडल्या जाणाऱ्या बच्चन यांच्या मार्गात काही तांत्रिक कारणांमुळे अडथळा आल्यामुळेच त्यांनी नाराजी व्यक्त केली असावी.
T 2466 – HELLO ! FaceBook ..! Wake up ..my page does not open fully .. been like this for days ! Had to use this medium to complain ,,SAD ! pic.twitter.com/SvzUHBBDvT
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 25, 2017
वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या
गेली बरीच वर्षे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे बिग बी लवकरच ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला माल्टामध्ये सुरुवात झाली असून, परफेक्शनिस्ट आमिर खानही त्यात झळकणार आहे. आमिर आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबद्दलची उत्सुकता पाहायला मिळत आहे.