हिंदी चित्रपटसृष्टीत येत्या काळात बरेच स्टारकिड्स पदार्पणासाठी सज्ज आहेत. याच स्टारकिड्सच्या यादीतील एक नाव म्हणजे सारा अली खान. सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी सारा ‘सिम्बा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती अभिनेता रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करत आहे.
धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत साकारण्यात येणारा हा चित्रपट साराच्या करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अशा या बहुचर्चित चित्रपटाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओमध्ये रणवीर सिंगचा कधीही न पाहिलेला अंदाज दिसतोय. ‘जो देतो त्रास त्याचा मी घेतो क्लास’, असं म्हणत ‘संग्राम भालेराव’ म्हणजेच रांगडा रणवीर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठमोळ्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत रणवीर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
The madness begins & here is just a sneak peek into it! #Simmba @karanjohar @apoorvamehta18 @RanveerOfficial #SaraAliKhan #RohitShetty @RSPicturez @RelianceEnt pic.twitter.com/TlKuxcnO39
— Dharma Productions (@DharmaMovies) June 6, 2018
वाचा : Top 5 : ‘संजू’आधीही ‘या’ वास्तवदर्शी बायोपिकने जिंकलेली प्रेक्षकांची मनं

रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात त्याला साथ मिळणार आहे ती म्हणजे सारा अली खान. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये सारासुद्धा मराठी बोलताना दिसतेय. त्यामुळे या दोन्ही कलाकारांचा हा मराठमोळा अंदाजही प्रेक्षकांची मनं जिंकत आहे, असंच म्हणावं लागेल. रोहित शेट्टीचं दिग्दर्शन असल्यामुळे या चित्रपटातही जबरदस्त अॅक्शन पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा ‘सिम्बा’ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरेल असं म्हणायला हरकत नाही.