माध्यमं आणि सोशल मीडियावर काही चेहरे नेहमीच चर्चेत असतात. अर्थात त्यांच्याविषयीच्या या चर्चा बऱ्याचदा संमिश्र असतात. अशाच काही बहुचर्चित चेहऱ्यांतील एक नाव म्हणजे, ऋषी कपूर. ऋषी कपूर यांच्या रागाचा पारा केव्हा चढेल याचा काहीच नेम नाही. पुरस्कार सोहळा म्हणू नका किंवा मग एखादी पार्टी. माध्यमांचे छायाचित्रकार किंवा इतर कोणत्या अनोळखी व्यक्तीच्या वागण्यावर ऋषी यांनी बऱ्याचदा नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे. सोशल मीडियावरही त्यांच्याविषयी संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळता. पण, त्यांचा हा राग आता मात्र चर्चेचा विषय ठरत असून, चाहत्यांमध्ये त्यांच्याविषयी एक वेगळंच वलय निर्माण करत आहे.

ऋषी कपूर यांनी पुन्हा एकदा चाहतीवर नाराजी व्यक्त करत सर्वांच्या नजरा स्वत:कडे वळवल्या आहेत. मुंबईतील वांद्रे- कुर्ला संकुल येथे असणाऱ्या एका रेस्तराँमध्ये ऋषी कपूर त्यांच्या कुटुंबासोबत गेले होते त्याचवेळी ही घटना घडल्याचे वृत्त ‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केलं आहे. ऋषी कपूर यांच्यासोबत त्यावेळी पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धीमा कपूरही उपस्थित होते. कपूर आणि त्यांचे कुटुंब त्या रेस्तराँमध्ये असताना तेथे इतरही बरीच मंडळी होती. त्यातीलच काहीजणांची या सेलिब्रिटी कुटुंबियांवर नजर पडली.

पाहा : Throwback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना

बी- टाऊनमधील हे प्रसिद्ध चेहरे पाहून एक चाहती कपूर कुटुंबियांसोबत सेल्फी काढण्साठी तेथे आली. तिने टेबलवळ जात रणबीर आणि नीतू कपूर यांच्यासोबत सेल्फी काढला पण, ऋषी यांच्यासोबत सेल्फी काढणे ती विसरुन गेली. त्यानंतर ऋषी कपूर आणि कुटुंबिय त्या रेस्तराँमधून निघाले तेव्हा ती चाहती ऋषी कपूर यांच्यापाशी आली आणि तिने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. पण, त्यावेळी तिला साफ नकार देत ऋषी पुढे निघाले. त्यांचे हे उत्तर ऐकून, ‘किती खाष्ट…’ असे ती पुटपुटली. तिचे हे बोलणे एकल्यानंतर मागे वळत ऋषी कपूर तिच्यावर संतापले. त्यांच्या बोलण्यामुळे शेवटी रणबीरने मध्यस्थी करत हा वाद मिटवला आणि परिस्थिती सावरुन नेली. चाहतीची निराशा झाल्याचे पाहून रणबीरने स्वत: तिची माफी मागितली.

एक कलाकार म्हणून चाहत्यांशी वागताना कलाकारांनीही काही गोष्टींचे भान राखले पाहिजे. पण, ऋषी कपूर मात्र या सर्व गोष्टी बऱ्याचदा विसरुन जातात अशी प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर देण्यात येतेय.