बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते असल्याचं सांगितलं आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदने स्थलांतरितांना केलेली मदत, सामनामधून करण्यात आलेली टीका, तसंच भाजपा प्रवेशावरुन सुरु असलेल्या चर्चेवर भाष्य करत आपली बाजू मांडली आहे. यावेळी त्याने भाजपात प्रवेश करण्याची आपली कोणतीही इच्छा नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.

“ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी सर्वसामान्य लोकांशी जोडले जातात ते मला आवडतं. मोदींचं व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे. मी त्यांचा आदर्श घेतो पण याचा अर्थ मी भाजपात प्रवेश करणार असा होत नाही,” असं सोनू सूदने सांगितलं आहे. भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चेवर बोलताना सोनू सूदने सांगितलं की, “मी भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. माझी राजकारणात प्रवेश करण्याची तसंच कोणत्याही पक्षात जाण्याची इच्छा नाही. मी एक इंजिनिअर होतो पण अभिनेता झालो. अभिनय करण्यावरच माझं पूर्ण लक्ष आहे”.

म्हणून मी मातोश्रीवर गेलो होतो –
सामना संपादकीयमधून करण्यात आलेल्या टीकेवर बोलताना सोनू सूदने सांगितलं की, “या संपूर्ण वादाची मला काहीच माहिती नव्हती. लोकांनी मला फोन करण्यास सुरुवात केली होती. काँग्रेस नेते अस्मल शेख माझे चांगले मित्र असून त्यांचाही मला फोन आला. तुला यावर काही स्पष्टीकरण द्यायचं आहे का असं त्यांनी विचारलं. तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भेटण्याची इच्छा आहे का असंही विचारल. यावर मी भेटण्यासाठी सहमती दर्शवली”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मातोश्रीवर काय चर्चा झाली ?
“संजय राऊत यांनी जे लिहिलं होतं ते खरं नव्हतं. ठाकरेंनाही हे योग्य नसल्याचं माहिती होतं. ते मला फार आधीपासून ओळखतात. या बैठकीत आपण सर्वजण स्थलांतरितांना मदत करत आहोत हाच निष्कर्ष निघाला. त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं, तसंच लागेल ती मदत करण्याचं आश्वासनही दिलं. संजय राऊत यांनी माझ्याबद्दल एक समज निर्माण केला होता आणि लिहिलं होतं,” असं सोनू सूदने सांगितलं आहे. पुढे बोलताना त्याने सांगितलं की, “महाराष्ट्रात राज्य सरकारच्या मदतीशिवाय मी काहीच करु शकत नाही. जर मी बस किंवा ट्रेनसाठी अर्ज केला तर तो राज्य सरकारच्या मार्फतच जाणार आहे”.