लॉकडाउनमुळे मुंबईत अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घऱी पोहोचवण्यासाठी मदतीचा हात दिल्याने बॉलिवूड अभिनेता सोनू सूदवर सगळीकडूनच कौतुकाचा वर्षाव झाला. पण सामना संपादकीयमधून करण्यात आलेल्या टीकेमुळे सोनू सूदच्या मदतीला राजकीय वळण लागलं. यानंतर सोनू सूदने मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याचे फोटोही समोर आले होते. दरम्यान मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल सोनू सूदने पहिल्यांदाच खुलासा केला आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.

“संजय राऊत यांनी जे लिहिलं होतं ते खरं नव्हतं. ठाकरेंनाही हे योग्य नसल्याचं माहिती होतं. ते मला फार आधीपासून ओळखतात. या बैठकीत आपण सर्वजण स्थलांतरितांना मदत करत आहोत हाच निष्कर्ष निघाला. त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं, तसंच लागेल ती मदत करण्याचं आश्वासनही दिलं. संजय राऊत यांनी माझ्याबद्दल एक समज निर्माण केला होता आणि लिहिलं होतं,” असं सोनू सूदने सांगितलं आहे.

पुढे बोलताना त्याने सांगितलं की, “महाराष्ट्रात राज्य सरकारच्या मदतीशिवाय मी काहीच करु शकत नाही. जर मी बस किंवा ट्रेनसाठी अर्ज केला तर तो राज्य सरकारच्या मार्फतच जाणार आहे”.

“ठाकरे सरकारने महाराष्ट्रात काहीच काम केलं नाही असं मी कुठेच बोललेलो नाही. त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. मुंबई शहर हाताळणं सोपी गोष्ट नाही. स्थलांतरितांना मदत करण्याची ही माझी पद्धत होती. पहिल्यात दिवशी मला ५० हजार जणांकडून घऱी पाठवण्याची विनंती आली होती. जेव्हा मी महामार्गावरुन चालत निघालेल्या लोकांशी बोललो तेव्हा ही समस्या किती मोठी आहे याची कल्पना आली. मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही मला स्थलांतरितांची मदत करायची असल्याचं सांगितलं,” असं सोनू सूदने सांगितलं आहे.

म्हणून मी मातोश्रीवर गेलो होतो
सामना संपादकीयमधून करण्यात आलेल्या टीकेवर बोलताना सोनू सूदने सांगितलं की, “या संपूर्ण वादाची मला काहीच माहिती नव्हती. लोकांनी मला फोन करण्यास सुरुवात केली होती. काँग्रेस नेते अस्मल शेख माझे चांगले मित्र असून त्यांचाही मला फोन आला. तुला यावर काही स्पष्टीकरण द्यायचं आहे का असं त्यांनी विचारलं. तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भेटण्याची इच्छा आहे का असंही विचारल. यावर मी भेटण्यासाठी सहमती दर्शवली”.

भाजपामध्ये प्रवेश करणार नाही
“मी भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. माझी राजकारणात प्रवेश करण्याची तसंच कोणत्याही पक्षात जाण्याची इच्छा नाही. मी एक इंजिनिअर होतो पण अभिनेता झालो. त्याच्यावर माझं पूर्ण लक्ष आहे”, असं सोनू सूदने स्पष्ट केलं आहे. पण यावेळी त्याने आपण नरेंद्र मोदींचे चाहते असल्याचं म्हटलं आहे. “ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी सर्वसामान्य लोकांशी जोडले जातात ते मला आवडतं. मोदींचं व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे. मी त्यांचा आदर्श घेतो पण याचा अर्थ मी भाजपात प्रवेश करणार असा होत नाही,” असं सोनू सूदने सांगितलं आहे.