|| स्वप्निल घंगाळे

सध्या तुम्ही ट्विटर सुरू केल्यास तुम्हाला ‘चौकीदार.. चौकीदार.. चौकीदार..’ इतकंच दिसेल. याचं कारण म्हणजे ट्विटरवर आलेली नामांतराची लाट. अर्थात ही नामांतराची लाट काही पहिल्यांदाच आलेली नाही. ट्विटरवर नाव बदलण्याचा हा फंडा खरं तर एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. ही प्रामुख्याने चित्रपटांच्या प्रमोशनसाठी वापरली जाते. ‘चौकीदार’च्या लाटेत त्यावर टाकलेली एक नजर..

सध्या देशात चौकीदार शब्दाची चांगलीच चर्चा असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांमधून वापरला गेलेला हा शब्द सध्या सोशल नेटवर्किंगवर जिथे तिथे पाहायला मिळतो आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी ट्विटरवर आपल्या नावाआधी चौकीदार हा शब्द लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी ट्विटरवर आपल्या नावात बदल करत नावाआधी चौकीदार हा शब्द लावला. त्यानंतर जणू चौकीदार हा शब्द नावाआधी लावण्याची लाटच आली. या लाटेत अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून ते अनेक राज्यांमधील भाजपच्या मुख्यमंत्र्यांनीही आपल्या नावात बदल करत नावाआधी चौकीदार जोडले. त्यानंतर अनेक भाजप समर्थकांनी सोशल मीडियावर आपल्या नावाच्याआधी चौकीदार असे लिहिले. मात्र भाजपच्या आयटी सेलने लढविलेली ही शक्कल उचललेलीच आहे असं म्हणता येईल. मुळात ठरावीक उद्देशासाठी सोशल नेटवर्किंगवर नाव बदलणे हे चित्रपटसृष्टीत अगदीच सामान्य गोष्ट आहे. हिंदीबरोबरच मराठीमध्येही प्रसिद्धीचा हा स्वस्तात मस्त फंडा वापरला जातो.

नावात काय आहे? असं प्रसिद्ध इंग्रजी नाटककार आणि लेखक शेक्सस्पिअरचे वाक्य आहे. मात्र आजच्या सोशल नेटवर्किंगच्या जगामध्ये नावातच सगळं आहे. नावावरून फॉलोअर्स, लाइक्स आणि सबस्क्रायबरची संख्या वाढते. जेवढे डिजिटल फॉलोअर्स जास्त तितके ऑनलाइन महत्त्व अधिक. आता हेच ऑनलाइन महत्त्व अनेक कलाकार सिनेमांच्या प्रसिद्धीसाठी वापरताना दिसत आहेत. आपल्या नावात बदल करून चित्रपटात साकारलेल्या व्यक्तिरेखेचं नाव मूळ नावाआधी लावण्याचा फंडा अनेक कलाकार मागील काही वर्षांपासून वापरताना दिसतात. नेटकऱ्यांच्या भाषेत सांगायचं तर सिनेमाच्या प्रसिद्धीचा भाग म्हणून अनेक कलाकार त्यांच्या चित्रपटाची ‘हवा करण्यासाठी’ नाव बदलतात. चित्रपटाचं किंवा त्यामधील व्यक्तिरेखेचं नाव चित्रपट प्रदर्शनापूर्वीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सोशल नेटवर्किंग साइट्स. ट्रेलर्स, पोस्टर्सबरोबरच आता चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या नावात सोशल नेटवर्किंगवरील प्रोफाइलमध्ये केलेला बदलसुद्धा प्रसिद्धीचा भाग झाला आहे. सध्या अभिनेत्री सोनम कपूरनेही ट्विटरवर आपले नाव झोया सिंग सोलंकी असं ठेवलं आहे. सोनमने आपल्या आगामी ‘द झोया फॅक्टर’ या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी हा बदल केला आहे.

हिंदीमध्ये सर्वात आधी असा प्रयोग करणारा सिनेमा ठरला ‘हॅप्पी न्यू इअर’. शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, सोनू सूद यांसारखी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटाची प्रसिद्धी सोशल नेटवर्किंगवर अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आली. चित्रपटातील सर्व कलाकारांनी आपले ट्विटरवरील खरे नाव बदलून त्याऐवजी भूमिकेचे नाव काही दिवस वापरले होते. म्हणजे शाहरुखने ‘चार्ली’, दीपिकाने ‘मोहिनी’, अभिषेकने ‘नंदू, बोमनने ‘टॅमी’ तर सोनूने ‘जग’ हे नाव ट्विटरवर वापरले होते. चित्रपटाची दिग्दर्शिका फराह खाननेही आपल्या ट्विटर अकाऊण्टवरील नावात बदल करून नावानंतर एचएनवाय म्हणजेच ‘हॅपी न्यू इयर’चा शॉर्टफॉर्म वापरला होता. त्यानंतर अशाप्रकारे चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी नाव बदलण्याची लाटच आली.

विशाल भारद्वाज यांच्या ‘हैदर’ या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या शाहीद कपूरने ट्विटरवर आपल्या नावातील एच ए आय डी ई आर ही अक्षरं मोठय़ा लिपीमध्ये ठेवून बाकी अक्षरं छोटय़ा लिपीत ठेवत हा ट्रेण्ड प्रसिद्धीसाठी वापरला. वरुण धवननेही ट्विटरवर अनेक चित्रपटांसाठी नाव बदलले आहे. ‘मै हूं हिरो’ चित्रपटाच्या  वेळी त्याने वरुण शिनू धवन असं नाव ठेवलं होतं, तर ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’च्या प्रसिद्धीसाठी त्याने ट्विटरवरील नावात बदल करत ते वरुण हम्प्टी धवन असं ठेवलं होतं. याच चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केलेल्या आलिया भटनेही चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी नावाआधी ‘दुल्हनिया’ हा शब्द वापरला होता. याशिवाय ‘एक व्हिलन’ या चित्रपटात काम केलेल्या श्रद्धा कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख या कलाकारांनी प्रसिद्धीसाठी आपल्या नावाआधी ‘व्हिलन’ हा शब्द लावला होता. रणवीर सिंगने एका नूडल्सच्या ब्रॅण्डची प्रसिद्धी करण्यासाठी आपले ट्विटरवरील नाव काही दिवस ‘रणवीर चिंग’ असं ठेवलं होतं. दीपिका पदुकोणनेही चित्रपटासाठी काही दिवस आपल्या ट्विटर प्रोफाइलचे नाव ‘फाइंडिंग फॅनी’ असं ठेवलं होतं. रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाच्या वेळी हा नामांतरणाचा फंडा त्यांच्या मित्रपरिवाराने वापरला. आपल्या नावांपुढे ‘लडकीवाले’ आणि ‘लडकेवाले’ लावत या दोघांकडची वऱ्हाडी मंडळी सज्ज झाली होती.

अभिनेता इम्रान हाश्मीनेही नाव बदलण्याचा हा ट्रेण्ड वापरला, पण तो निषेध करण्यासाठी. परीक्षांमधील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा ‘चीट इंडिया’ हा चित्रपट आधी ‘व्हाय चीट इंडिया’ नावाने प्रदर्शित होणार होता. मात्र परिनिरीक्षण मंडळाने ‘व्हाय’ शब्दामुळे चुकीचा अर्थ निघत असल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेत तो शब्द वगळून चित्रपटाच्या  नावाला सहमती दिली. याचा विरोध करण्यासाठी इम्रानने आपल्या ट्विटरवर हॅण्डलवरील नाव ‘व्हाय इम्रान हाश्मी’ असं केलं होतं.

स्वप्निल जोशीने तर यानंतर जवळ जवळ आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी हा नाव बदलण्याचा फंडा वापरला. ‘मितवा’साठी शिवम सारंग, ‘मी पण सचिन’साठी सचिन, ‘मुंबई पुणे मुंबई २’साठी गौतम, ‘फुगे’साठी आदित्य असं अनेक वेळा स्वप्निलने ट्विटरवर आपलं नाव बदललं आहे. ‘मुंबई पुणे मुंबई ३’च्या प्रसिद्धीच्या वेळी ट्विटरवरील प्रोफाइलमधील नावाआधी मुंबईकर किंवा पुणेकर लावण्याची स्वप्निल आणि मुक्ता बर्वेच्या चाहत्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली होती.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंनी आपल्या ‘सिद्धांत’ या चित्रपटासाठी ट्विटरवरील आपलं नाव ‘सिद्धांत आप्पा ठोसर’ असं केलं होतं. श्रेयस तळपदेने त्याच्या ‘बाजी’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ट्विटरवर नावाआधी बाजी शब्द लावून ते ‘बाजी श्रेयस’ असं ठेवलं होतं. ‘क्लासमेट’ चित्रपटाच्या वेळीही अनेक कलाकारांनी आपल्या नावाआधी ‘क्लासमेट’ शब्द लावला होता. ‘गुरु’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीही अंकुश चौधरीने आपल्या ट्विटरवरील नावाआधी गुरु शब्द वापरून गुरु अंकुश असं केलं होतं. ‘कांकण’ चित्रपटाची अशा प्रकारे प्रसिद्धी करताना कलाकारांनी नावाआधी कांकण हा शब्द वापरला होता, तर ‘माऊ ली’ चित्रपटासाठी रितेश देशमुखने आपले ट्विटरवरील नाव बदलून माऊ ली रितेश असं ठेवलं होतं. थोडक्यात सांगायचं तर आपण साकारलेल्या पात्राचे नाव प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्यापासून ते आक्षेप नोंदविण्यापर्यंत अनेक कारणांसाठी हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकार हा नामांतरणाचा फंडा वापरत आले आहेत. यंदा तरुण मतदारांची संख्या लक्षात घेत जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपने हाच फंडा वापरण्याचा निर्णय घेत ‘चौकीदार’चा आधार घेतला आहे. आता याचा पक्षाला किती फायदा होणार हे २३ मे नंतरच कळणार आहे.

‘हॅपी न्यू इयर’ या २०१४च्या चित्रपटापासून नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय झालेला फंडा मराठीमध्येही त्याच वर्षी पहिल्यांदा वापरला गेला. संजय जाधव दिग्दर्शित ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ पासून मराठीत हा नामांतरणाचा ट्रेण्ड दाखल झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी चित्रपटातील सर्व कलाकारांबरोबरच दिग्दर्शक संजय जाधवनेही आपल्या नावाच्या अलीकडे ‘प्यारवाला’ किंवा ‘प्यारवाली’ लावलं होतं. त्यामुळे स्वप्निल ‘प्यारवाला स्वप्निल’ तर अमृता ‘प्यारवाली अमृता’ झाली होती. याच चित्रपटासाठी गाणं गाणाऱ्या रोहित राऊत या तरुण गायकानेही आपल्या नावाआधी ‘प्यारवाला’ लावलं होतं. संजय जाधव यांच्या चमूने हाच फंडा ‘तू ही रे’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वापरत नावाआधी ‘तू ही रे’ हे शब्द वापरले होते.