गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतही चांगलाच पाऊस सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात मुंबईच्या माटुंगा परिसरातील तुळसी पाईप रोडवर एक महिला भर पावसात मॅनहोल शेजारी उभी राहून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचा अपघात होऊ नये म्हणून त्यांना मार्ग दाखवताना दिसली. कांता मारुती कलन असं या महिलेचं नाव असून ती माटुंगा स्थानकाबाहेरील फुटपाथवरील झोपडपट्टीत राहते.

कांता यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनेदेखील या महिलेला सलाम केला आहे. अनुष्काने त्या महिलेबाबत नितांत आदर व्यक्त केला आहे. तसेच तिच्या निरपेक्ष भावनेने केलेल्या सेवेला सलाम केला आहे. अनुष्काने आपल्या इन्टाग्राम स्टोरीवर तिचा फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

कांता यांनी नक्की काय केलं?

३ ऑगस्ट रोजी मुंबईत मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे पाईप लाईन भागात पाणी साचायला लागलं. महापालिकेचे कर्मचारी पाण्याचा निचरा होण्यासाठी येत नसल्याचं पाहून कांता यांनी एका बाईकस्वाराच्या मदतीने रस्त्यावरील मॅनहोलचं झाकण उघडलं आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्याला वेगळी वाट करुन दिली. मॅनहोलचे झाकण उघडल्यानंतर वाहनचालकांचा अपघात होईल हे त्यांना लक्षात आल्यानंतर कांतता सहा वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत तिकडेच उभं राहत वाहनांना सुरक्षित वाट दाखवत होत्या.