शालेय अभ्यासक्रमामध्ये गेल्या काही वर्षांपासून बरेच बदल करण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे या अभ्यासक्रमाला आता बॉलिवूडचा टचही मिळाला आहे, असंच म्हणावं लागेल. असं म्हणण्यामागचं कारणही तसच आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणनच्या एका भाषणाचा काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करुन घेण्यात आला आहे. एका ट्विटर युझरने यासंबंधीचे फोटो पोस्ट करत यासंबंधीची माहिती दिली. दीपिकानेही या ट्विटला उत्तर देत आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे ही अनेकांसाठी आनंदाचीच बाब आहे, असं म्हणायला हरकत नाही.

२०१६ मध्ये ‘पिकू’ या चित्रपटातील अभिनयासाठी दीपिकाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला होता. त्याचवेळी तिने व्यासपीठावर सर्वांसमोर आपल्या वडिलांनी म्हणजेच प्रकाश पदुकोण यांनी लिहिलेलं एक पत्र वाचून दाखवलं होतं. एका वडिलांनी आपल्या मुलींप्रती असलेलं प्रेम, गर्व, त्यांची वाटणारी काळजी या सर्व भावना त्या पत्रात शब्दांच्या रुपात मांडण्यात आल्या होत्या.

दीपिका पदुकोणच्या आजवरच्या कारकिर्दीत तिच्या वडिलांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्टमधूनही याचा अंदाज अनेकदा आला आहे. दरम्यान, दीपिकाने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याच्या वेळी वाचलेल्या त्या पत्रातून प्रकाश पदुकोण यांनी काही मांडलेले महत्त्वाचे मुद्दे आणि आपल्या मुलींवर असणारा त्यांचा विश्वासही सर्वांसमोर आला होता. आपल्या दोन्ही मुलींना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात त्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीला पर्याय नाही असंही सांगितलं होतं. ‘तुम्ही काय करता हे जर तुम्हाला आवडत असेल तर मग पुरस्कार किंवा कोणत्याच गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही’, हा महत्त्वाचा उपदेशही त्यांनी या पत्रातून केला होता. त्यामुळे दीपिकाच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या क्षणांची साक्ष असलेलं हे पत्र शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाणं ही अनेकांसाठीच आनंदाची बाब आहे.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

https://www.instagram.com/p/BVe1AoLB5Ze/