सहसा सलमान खानच्या वक्तव्यावरुन कोणीही त्याच्यावर निशाणा साधत नाही. पण, याला काही अपवादही असू शकतात. किंबहुना आहेतही. चित्रपटसृष्टीत एका कलाकाराच्या वक्तव्याशी सर्वजण सहमत असतील असं नाही. याचाच प्रत्यय अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या वक्तव्यातून आला आहे.

दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलतेवेळी दीपिकाने सलमानचं नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमात ती ताणतणाव आणि नैराश्यग्रस्त परिस्थितीशी सामना करण्याच्या मुद्द्यावरुन वक्तव्य करत होती. दीपिकाने नेहमीच या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपलं ठाम मत मांडलं आहे. किंबहुना नैराश्याशी तिने स्वत:सुद्धा लढा दिला आहे. अशा गंभीर परिस्थिचा सामना करणाऱ्यांसाठी दीपिका एक संस्थाही चालवते. ‘लीव्ह, लव्ह, लाफ फाऊंडेशन’ असं त्या संस्थेचं नाव आहे. या सर्व गोष्टी नजरेत घेत दीपिकाने नैराश्याविषयी आपलं मत मांडण्यास सुरुवात केली.

नकळतच तिच्या बोलण्याचा रोख सलमानच्या ‘त्या’ वक्तव्याकडे इशारा करु लागला ज्यात त्याने नैराश्य आपल्याला परवडणारं नाही, असं म्हटलं होतं. ‘बऱ्याचदा नैराश्याची चैनीच्या गोष्टींशी तुलना केली जाते. पण, हा समज मोडित काढण्याची गरज आहे’, असं ती म्हणाली. तिच्या या वक्तव्यामध्ये सलमानने समज घेणं अभिप्रेत होतं की नाही, याचं उत्तर खुद्द दीपिकाच देऊ शकते. पण, ज्यांच्या ही बाब लक्षात आली, त्यांनी याविषयी हाच तर्क लावला की, बी- टाऊनच्या मस्तानीने दबंग खानवर निशाणा साधला.

वाचा : Ball Tampering: डेव्हिड वॉर्नरची टीमच्या व्हॉट्स अॅप ग्रुपमधून एक्झिट

‘अशाही बऱ्याच व्यक्ती मी पाहिल्या आहेत, जे भावनेच्याभरात वाहत जाऊन नैराश्यग्रस्त होतात. पण ही गोष्टीसुद्धा मला परवडणारी नाही. मी दु:खी किंवा भावनिक झालो किंवा मग इतर कोणत्याही परिस्थितीचा सामना करत असेन तर या गोष्टी माझ्या विरोधातच जातात’, असं वक्तव्य सलमानने केलं होतं. ज्यावरुनच दीपिकाने त्याला सुनावल्याचं म्हटलं जात आहे.

नैराश्य आणि ताणतणाव याविषयी आपलं मत मांडत तिने पुढे काही गोष्टीही स्पष्ट केल्या. नैराश्याचा सामना हे फक्त यशस्वी आणि प्रसिद्ध व्यक्तीच करतात हे पूर्णपणे चुकीचं असून, मला एक गोष्ट सर्वांनाच सांगायची आहे, की कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱी व्यक्ती या परिस्थितीतून जाते, असंही तिने सांगितलं.