अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू बुडून झाल्याचे फॉरेन्सिक तपासणीतून उघड झाले आहे. मद्यप्राशनामुळे श्रीदेवी यांचा तोल गेल्याने त्या बाथटबमध्ये पडल्या आणि बाथटबमधील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला, असे तपासणीतून समोर आले आहे.श्रीदेवी यांच्या रक्तात मद्याचा अंश आढळला आहे.

नायकप्रधान हिंदी सिनेसृष्टीत एका नायिकेला पहिल्यांदाच सुपरस्टार पदाच्या सिंहासनावर विराजमान करणारी महानायिका श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. पुतण्याच्या लग्नानिमित्त श्रीदेवी दुबईत गेल्या होत्या. दुबईतील हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. फॉरेन्सिक तपासणीतून श्रीदेवी यांच्या मृत्यूचे नेमके कारण आता स्पष्ट झाले आहे.

दुबईतील रुग्णालयात झालेल्या फॉरेन्सिक तपासणीत मृत्यूचे कारण समोर आले आहे. श्रीदेवी यांनी मद्यप्राशन केले होते. मद्यप्राशनामुळे श्रीदेवी यांचा तोल गेला आणि त्या बाथटबमध्ये पडल्या. बाथटबमधील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला, असे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये म्हटले आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव शवपेटीत ठेवण्याच्या प्रक्रीयेसाठी पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तर दुबईतील यंत्रणांनी अशा केसेसमधील कायदेशीर प्रक्रियेसाठी हे प्रकरण संबंधीत विभागांकडे पाठवल्याचे दुबईमधील माध्यमांनी म्हटले आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव संध्याकाळी दुबईतून मुंबईकडे रवाना होणार असून रात्री उशिरा त्यांचे पार्थिव मुंबईत दाखल होणार आहे. ह्रदयविकाराचा धक्का किंवा कार्डिअॅक अरेस्टमुळे श्रीदेवी यांचा मृत्यू झालेला नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, दुबईतील रुग्णालयाबाहेर बोनी कपूर आणि श्रीदेवी यांचे चाहते व मित्रांनी गर्दी केली होती. ‘आम्ही गेल्या १० वर्षांपासून बोनी कपूरला ओळखतो. त्याच्यावर हा दुःखद प्रसंग ओढावला असून आम्ही या कठीण प्रसंगात त्याला साथ देण्यासाठीच इथे आलो’ असे एका महिलेने सांगितले. दुबईतील भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय देखील कपूर कुटुंबीयांच्या मदतीला धावले होते.