हॉलिवूड अभिनेत्री मेरील स्ट्रीप गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यानंतर चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. मेरील स्ट्रीपच्या आभार प्रदर्शनाच्या भाषणानंतर ट्रम्प यांनी तिच्या अभिनयावर शंका व्यक्त केली असताना बॉलिवूडमधेही त्यांच्या भाषणावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. अभिनेत्री आलिया भट्टने मेरील स्ट्रीपचा फोटो शेअर करुन समर्थन व्यक्त केल्यानंतर आता अनुष्कालाही मेरील यांचे बिनधास्त भाषण चांगलेच भावल्याचे दिसते. अनुष्काने मेरील स्ट्रिप यांच्या भाषणाचे कौतुक करण्यासाठी इन्स्टाग्रामवर खुले पत्र लिहले आहे. तिच्यासोबत बॉलिवूडमधील चित्रपट निर्माता अनुराग कश्यपनेदेखील मेरीलवर कौतुकांचा वर्षाव केला. आपल्या क्षेत्रामध्ये असे भाषण देण्याची गरज नाही, असे सांगत त्याने सत्य मुद्याकडे लक्ष वेधणाऱ्याला ठाम पाठिंबा देणे आवश्यक असल्याचे म्हटले. अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील मेरीलचे समर्थन केले आहे. तिनेही मेरलिनसोबतचा फोटो शेअर केला आहे.

या कार्यक्रमात मेरील स्ट्रीपने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता. गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात मेरील स्ट्रीप यांना लाइफ टाइम अचिव्हमेंट या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. आभार प्रदर्शनावेळी त्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुक प्रचारादरम्यान अपंग पत्रकाराचा अपमान केल्याच्या गोष्टीला मेरील स्ट्रीप यांनी या सोहळ्यात उजाळा देण्याचा प्रयत्न केला. यावर्षाच्या एका घटनेने मला हैराण केल्याचे सांगताना पत्रकाराची मस्करी उडविणाऱ्या नेत्याची त्यांनी आठवण करुन दिली. स्ट्रीप यांच्या अभिनयावर शंका व्यक्त करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मेरिल स्ट्रीपला प्रत्त्युत्तर दिले. मेरिनच्या अभिनयात बाज नसताना तिचे उगाचच कौतुक करण्यात येत असल्याचे मत ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले होते. ‘मी तिला ओळखत नसून ती माझ्यावर विनाकारण टीका करत असल्याचा उल्लेख देखील ट्र्म्प त्यांनी ट्विटमध्ये केला होता.

७४ व्या गोल्डन ग्लोब अवार्ड सोहळा कॅलिफोर्नियात बेवर्ली येथे पार पडला. अपेक्षेप्रमाणे ‘ला ला लँड’ चित्रपटाने यंदाच्या गोल्डन ग्लोबवर ७ अॅवार्ड मिळवत वर्चस्व गाजवले. ७ गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळवत या चित्रपटाने एक विक्रम बनवला आहे. याआधी एकाच चित्रपटाला एवढे गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाले नाहीत.