आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी किंवा काही सामाजिक मोहिमेचा प्रचार करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना अर्थात ‘सेलिब्रेटी’ना ‘सदिच्छा दूत’ म्हणून घेण्याची पद्धत सुरू झाली आहे. यात प्रामुख्याने क्रिकेटपटू आणि बॉलीवूडमधील कलाकार यांचा सहभाग अधिक असतो. यांच्या प्रसिद्धीचा आणि समाजातील स्थानाचा फायदा करून घेण्यासाठी या मंडळींना ‘सदिच्छा दूत’ म्हणून करारबद्ध केले जाते. काही वेळा हे ‘सदिच्छा दूत’ वादग्रस्त ठरतात. बॉलीवूड ‘खान’दानातील आमिर खान हे त्याचे ताजे उदाहरण. आमिरच्या निमित्ताने..

बॉलीवूडचा अभिनेता आमिर खान याने भारत सोडून जाण्याच्या केलेल्या तथाकथित वक्तव्यावरून गदारोळ झाला आणि ‘अतुल्य भारत’या मोहिमेच्या तसेच रस्ता सुरक्षा अभियानाच्याही ‘सदिच्छा दूत’पदावरून आमिरची उचलबांगडी करण्यात आली. आमिरची मुदत संपली होती किंवा अन्य काही कारणे दिली जात असती तरी वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने आमिरला हटविण्यात आले असाच सर्वसामान्यांचा ठाम समज आहे. समाजात जी मंडळी ‘सेलिब्रेटी’ म्हणून ओळखली जातात अशांना ‘सदिच्छा दूत’ बनविण्यासाठी अग्रक्रम दिला जातो. केवळ सामाजिक योजना किंवा उपक्रमच नव्हे मोठमोठय़ा कंपन्यांच्या उत्पादनांसाठीही या ‘सेलिब्रेटीं’ंना करारबद्ध केले जाते. देशभरात आजच्या घडीला सुमारे शंभरहून अधिक कंपन्यांसाठी ‘सेलिब्रेटी’ ‘सदिच्छा दूत’ म्हणून काम करत आहेत. सामाजिक मोहिमांसाठी विनामोबदला काम करणारे (?) हे ‘सेलिब्रेटी’नामवंत उत्पादक कंपन्या किंवा अन्य आस्थापनांसाठी काम करताना मात्र घसघशीत मानधन घेतात. असे मानधन घेणे गैर नाही किंवा आपले आत्ता नाव आहे म्हणून ‘कमावून’घेणे हेही चुकीचे नाही. पण काही वेळेस आपण ज्या उत्पादनासाठी ‘सदिच्छा दूत’ म्हणून काम करणार आहोत त्याचे समाजावर काय बरे-वाईट परिणाम होतील याचा सारासार विचार करणेही आवश्यक आहे. पण काही सन्माननीय अपवाद वगळता असा विचार कोणीही ‘सेलिब्रेटी’ करत नाहीत. त्यामुळे ही मंडळी ‘सदिच्छा’ की ‘कमाई’दूत असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. ‘दो बूंद जीवन के’, ‘बस दो बूंद जीवन के’ असे जेव्हा अमिताभ बच्चन सांगतो तेव्हा खेडय़ापाडय़ातल्या आणि शहरी भागांतील उच्चविद्याविभूषित लोकांनाही ‘पल्स पोलिओ’ योजनेचे महत्त्व पटते. मरणोत्तर ‘नेत्रदान’विषयी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन जेव्हा संदेश देते तेव्हा त्याला नक्कीच महत्त्व प्राप्त होते. किमान त्यादृष्टीने नागरिक विचार तरी करायला लागतात. मरणोत्तर नेत्रदानाविषयी अभिनेते प्रशांत दामले यांनी स्वत: अर्ज भरून दिला आणि आपल्या एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान नाटय़गृहात उपस्थित प्रेक्षकांकडूनही याबाबतचे अर्ज भरून घेतले. समाजातील अशा ‘सेलिब्रेटी’ व्यक्तींकडून समाजोपयोगी चळवळ व मोहिमेसाठी असा पुढाकार घेतला जातो तेव्हा त्याचे काही प्रमाणात तरी सकारात्मक परिणाम नक्कीच पाहायला मिळतात. या मंडळींनी अमुक करा किंवा अमुक करू नका असे आवाहन केले म्हणजे जादूची कांडी फिरविल्यासारखा सर्व समाज बदलेल असे अजिबात होणार नाही. पण काही टक्के नागरिकांवर तरी याचा प्रभाव पडेल किंवा ते त्या दृष्टीने विचार करायला लागतील हा फायदा या ‘सेलिब्रेटी’सदिच्छा दूतांकडून होण्यास नक्कीच मदत होईल. रस्ता सुरक्षा अभियान, मद्यपान करून गाडी चालवू नका, मरणोत्तर देहदान, नेत्रदान किंवा अवयव दान, पल्स पोलिओ चळवळ, स्वच्छता मोहीम, ‘मुलगी वाचवा’ चळवळ अशा अनेक सामाजिक मोहिमांसाठी नामवंत कलाकारांनी ‘सदिच्छा दूत’ म्हणून काम केले आहे.

Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

जाहिरातीमधील कामही वादग्रस्त

काही वेळेस ‘सदिच्छा दूत’ म्हणून किंवा काही उत्पादनांच्या जाहिरातीत काम करणारे हे ‘सेलिब्रेटी’  वादाच्या भोवऱ्यात सापडले असल्याचे पाहायला मिळाले आहे. यात प्रामुख्याने ‘पेप्सी’, ‘कोक’, ‘मॅगी’ या सारख्या उत्पादनांचा समावेश आहे. या शीतपेयांचे घातक परिणाम समोर येऊ लागल्यानंतर सेलिब्रेटींनी केवळ घसघशीत ‘मानधन’ मिळते म्हणून अशा आरोग्याला अपायकारक असणाऱ्या जाहिरांतीमधून काम करावे का? असा सवालही उपस्थित करण्यात आला होता. ‘मॅगी’च्या जाहिरातीत काम केल्यामुळे अभिनेत्री माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन हेही वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. राज्यातील काही नागरी सहकारी बँकांसाठी ‘सदिच्छा दूत’ म्हणून मराठीतील नामवंत कलाकार गेली अनेक वर्षे काम करत आहेत. एखाद्या विशिष्ट कलाकाराला आपल्या आस्थापनेसाठी वर्षांनुवर्षे करारबद्ध करावे का? की काही वेगळे करता येईल?असा विचार बँकिंग क्षेत्रात सुरू झाला असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात आले. म्हणजे एकाच कलाकाराची ‘सदिच्छा दूत’ म्हणून निवड न करता बँकेच्या वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या कलाकारांची निवड केली जावी. ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना असेल तर एखादा ज्येष्ठ कलाकार, तरुणांसाठी योजना असेल तर युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या दूरचित्रवाहिन्यावरील मालिकेतील कलाकारांना घेतले जावे, असा एक नवा विचार पुढे येऊ लागला असल्याचे सहकारी बँकिंग क्षेत्रातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

‘कोटीच्या कोटी उड्डाणे’

नामवंत उत्पादन कंपन्यांसाठी सदिच्छा दूत म्हणून काम करण्यासाठी या ‘सेलिब्रेटी’व्यक्तींच्या मानधनाच्या आकडय़ांची ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे होत आहेत. याविषयी अधिकृतपणे किंवा उघडपणे कोणीही बोलत नसले तरी मानधनाची ‘कोटीच्या कोटी’उड्डाणे सर्वसामान्यांचे आणि आयकर विभागाचेही डोळे विस्फारायला लावणारी आहेत. बॉलीवूडचे ‘शहेनशहा’ अर्थात ‘बीग बी’अमिताभ बच्चन हे या क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय ‘सदिच्छा दूत’ मानले जातात. बॉलीवूड ‘सदिच्छा दूत’ यादीतील सगळ्यांचेच ते ‘महागुरू’ आहेत. ‘कॅडबरी’, ‘डाबर’, ‘इमामी’, ‘गुजरात राज्य पर्यटन विकास महामंडळ’, ‘आयसीआयसीआय’, ‘नेरोलॅक्स’, केंद्र शासनाची पल्स पोलिओ मोहिम, ‘झेन मोबाइल’, ‘बोरोप्लस’, ‘नवरत्न तेल’, आदी मातब्बर कंपन्यांसाठी त्यांनी ‘सदिच्छा दूत’ म्हणून काम केले आहे. राज्य शासनाच्या वन विभागासाठी ‘सदिच्छा दूत’ म्हणून काम करण्याची विनंती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच अमिताभ बच्चन यांना केली होती. अमिताभ यांनीही त्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे व्याघ्र संरक्षणाच्या मोहिमेला आता अधिक ‘ग्लॅमर’ मिळण्याची शक्यता आहे.

मराठी कलाकार ‘सदिच्छा दूत’ मराठी रंगभूमीवरील उत्साह आणि चैत्यनाचा खळाळता धबधबा  म्हणून अभिनेता प्रशांत दामले यांच्याकडे पाहिले जाते. ‘दिशा डायरेक्ट’ आणि ‘शामराव विठ्ठल को. ऑप. बँक’ यांचे ‘सदिच्छा दूत’ म्हणून त्यांनी काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ या अभियानासाठी अभिनेता मकरंद अनासपुरे याची ‘सदिच्छा दूत’ म्हणून निवड केली. संगीतकार सलील कुलकर्णी हे ‘डोंबिवली नागरी सहकारी बँके’चे, अभिनेते सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर हे कलाकार दाम्पत्य ‘ठाणे जनता सहकारी बॅंके’चे (टीजेएसबी)तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे ‘सारस्वत’ बँकेचे ‘सदिच्छा दूत’म्हणून जाहिरातीद्वारे लोकांना परिचित झाले आहेत.

अभिनेता सिद्धार्थ जाधव याने राज्य शासनाच्या दारूबंदी प्रचार मोहिमेचा ‘सदिच्छा दूत’म्हणून काम पाहिले. ‘अनुवेद’या साबण उत्पादन करणाऱ्या कंपनीसाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी काम पाहिले होते. सेलिब्रेटीच का हवेत ‘सदिच्छा दूत’ बॉलीवूडचे कलाकार आणि क्रिकेटपटू यांना सर्वाधिक ‘ग्लॅमर’ आहे. त्यांना ‘सदिच्छा दूत’ म्हणून घेतल्याने उत्पादनाची ‘किंमत’ आणि महत्त्व वाढत असल्याने उत्पादक कंपन्यांकडून त्यांचीच ‘सदिच्छा दूत’ म्हणून निवड केली जाते. पण यात काही बदल केला तर म्हणजे ज्यांना ‘ग्लॅमर’नाही किंवा जे ‘सेलिब्रेटी’ नाहीत, पण जी काही मोजकी मंडळी समाजात नि:स्पृह वृत्तीने समाजाच्या भल्यासाठी वर्षांनुवर्षे काम करत आहेत त्यांना हा बहुमान दिला तर तो नक्कीच वेगळा पायंडा पडू शकेल. भावी पिढी आणि तरुणांपुढेही एक चांगला ‘आदर्श’ समोर ठेवता येईल. कोणीतरी त्याची सुरुवात करायला काय हरकत आहे.

अवयव दानाच्या जनजागृतीसाठी..

समाजात अवयव दानाचे महत्त्व रुजावे आणि जास्तीत जास्त  लोकांनी यात सहभागी व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ‘सदिच्छा दूत’ म्हणून जुही पवार या तरुणीची निवड केली. जुहीने आपले यकृत वडिलांसाठी दान केले. तरुण वयात तिने केलेल्या या घटनेकडे कौतुक व आदराने पाहिले गेले. अवयव दानाचा समाजात मोठय़ा प्रमाणात प्रसार व्हावा,  यासाठी शासनाने तिची निवड केली.

बॉलीवूडचे सेलिब्रेटी व ते ‘सदिच्छा दूत’ असलेल्या कंपन्या

  • आमिर खान : मोनॅको, टाटा स्काय, सॅमसंग
  • ऐश्वर्या राय-बच्चन : आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया, लक्स, पल्स पोलिओ मोहीम
  • अक्षय कुमार : एल. जी. मायक्रोमॅक्स, थम्सअप
  • हृतिक रोशन : हिरो होंडा, पार्ले, सोनी एरिक्सन
  • करिना कपूर : एअर टेल, इमामी, हेड अ‍ॅण्ड शोल्डर्स, लक्स, महिद्र स्कुटर्स, पेप्सी, सोनी एरिक्सन
  • कतरिना कैफ : लक्स, नक्षत्र, पॅनॉसोनिक, स्पाइस टेलिकॉम
  • सैफ अली खान :एशियन पेंट्स, एअर टेल, हेड अ‍ॅण्ड शोल्डर्स
  • शाहरुख खान : एअरटेल, डीश टीव्ही, इमामी, आयसीआयसीआय, नोकिया, व्हिडीओकॉन
  • सलमान खान : थम्सअप, सुझुकी, व्हील, स्कुटी, यात्रा डॉट कॉम
  • रणबीर कपूर : लेनोव्हा, पेप्सी, टाटा डोकोमो
  • दीपिका पदुकोण : पेप्सीकोला, अ‍ॅक्सिस बँक