14 December 2017

News Flash

कलाकारांच्या मानधनाचं गणित आमिर समजावून सांगतो तेव्हा

जाणून घ्या कोणत्या निकषांवर ठरतं कलाकारांचं मानधन

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 12, 2017 1:24 PM

आमिर खान

कलाविश्वात काम करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्याच्या मानधनाविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये बरंच कुतूहल पाहायला मिळतं. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे आमिर खान. मानधनाच्या बाबतीत अग्रणी असलेल्या सेलिब्रिटींमध्ये आमिरच्या नावाचाही समावेश होतो. पण, त्याचं मानधन नेमकं कोणत्या निकषांवर दिलं जातं हाच प्रश्न वारंवार उपस्थित केला जात असल्यामुळे खुद्द आमिरनेच मानधनाच्या निकषांचा उलगडा केला आहे.

आमिरच्या मते कलाकारांना त्यांच्या स्त्री किंवा पुरुष असण्याच्या मुद्द्यावरुन नव्हे तर, त्यांच्या लोकप्रियतेच्या आधारे मानधन मिळालं पाहिजे. ‘सिक्रेट सुपरस्टार’ या आगामी चित्रपटामध्ये अभिनेता आमिर खान पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘दंगल’ फेम अभिनेत्री झायरा वसिम या चित्रपटात ‘इन्सिया’ या महत्त्वाकांक्षी मुलीच्या मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे झायराला आमिरहून जास्त मानधन मिळालं आहे का, असा प्रश्न विचारला असता माध्यमांच्या या प्रश्नाचं उत्तर देत तो म्हणाला, “मला एकही चेक मिळाला नाही. कारण कामाच्या सुरुवातीलाच मी मानधन घेत नाही. चित्रपटांच्या मानधनाविषयी सांगायचं झालं तर इथे दोन स्तरांवर मानधन दिलं जातं. त्यातील पहिला स्तर म्हणजे तुम्ही करत असलेलं काम. यामध्ये सर्व कलाकारांना समान मानधन मिळालं पाहिजे. चित्रपट साकारताना हातभार लावणाऱ्या तंत्रज्ञांनासुद्धा कलाकारांच्या बरोबरीनेच मानधन मिळालं पाहिजे. तर दुसरं म्हणजे चित्रपटाच्या टीममध्ये दोन-तीन व्यक्ती असे चेहरे असतात ज्यांच्यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहांकडे खेचले जातात. जे इतरांना शक्य होत नाही. यालाच बहुधा ‘स्टारडम’ म्हटलं जात असावं”.

आपलं हेच वक्तव्य विस्तृत पद्धतीने सांगत आमिर म्हणाला, ‘मोठ्या संख्येने प्रेक्षकांचं लक्ष वेधणाऱ्या कलाकाराला जास्त मानधन मिळालं पाहिजे. ज्या दिवशी झायरा या टप्प्यावर पोहोचेल तेव्हा सहाजिकच तिच्या मानधनाचा आकडाही वाढेल.’ एक निर्माता म्हणून मानधनाच्या या गणितांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोनही त्याने यावेळी सर्वांसमोर ठेवला. ‘तुम्ही स्त्री आहात किंवा पुरुष किंवा प्राणी, मला याने काहीच फरक पडत नाही. एक निर्माता म्हणून तुम्ही मला नफा मिळवून देत असाल तर मी त्यासाठी तुम्हाला नक्कीच जास्त मानधन देईन’, असं आमिर म्हणाला.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

आपण गेल्या दहा चित्रपटांचं मानधन घेतलं नसल्याचा उलगडाही आमिरने यावेळी दिला. ‘मी गेल्या दहा चित्रपटांत मानधन घेतलं नाही. सुदैवाने ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. जर तसं झालं नसतं तर माझ्यावर अनेकांनीच निशाणा साधला असता. तसं पाहिलं तर निर्माते, वितरक, गुंतवणूकदार यांना त्यांचा भाग दिल्यानंतर अगदी शेवटी मी मानधन घेतो’, असं त्याने स्पष्ट केलं. यावेळी आमिरने चित्रपटसृष्टीमध्ये असणाऱ्या असमानतेकडेही लक्ष वेधलं. नेहमी पुरुष कलाकारांनाच जास्त मानधन मिळण्याचं कारण बालपणापासून आपल्याला मिळणारी शिकवण आहे, असं म्हणत त्याने चित्रपटसृष्टीत आजही स्त्री-पुरुष असमानता आहे हा मुद्दा प्रकाशझोतात आणला.

First Published on October 12, 2017 1:24 pm

Web Title: bollywood dangal fame actor aamir khan explains how actors are paid in industry