देशावर करोनाचं संकट असल्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाउन करण्यात आला होता. या लॉकडाउनच्या काळात अनेक उद्योग-व्यवसाय बंद झाले असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली. या बंदचा परिणाम सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींवरही झाल्याचे दिसून आले. कलाविश्वातील कामकाज ठप्प झाल्यामुळे अनेक जणांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी वेगवेगळे मार्ग स्वीकारले होते. यामध्ये महिला कॅमेरापर्सन सुचिस्मिता (suchismita routray)चा देखील समावेश आहे. तिने आजवर अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, प्रभू देवा, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित यांच्यासोबत काम केले आहे. पण आता ती मोमोज विकण्याचे काम करत आहे.

सुचिस्मिता ही मूळची ओडिसामधील कटक येथील आहे. ती आईसोबत राहते. वडिलांच्या निधनानंतर सुचिस्मिता पैसे कमावू लागली आणि मिळणाऱ्या पैशामधून त्यांचे घर चालत होते. ती गेल्या सहा वर्षांपासून मुंबईमध्ये काम करत होती. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तिची नोकरी गेली. त्यानंतर ती मोमोज विकण्याचे काम करु लागली. यामधून तिला दिवसाला ३०० ते ४०० रुपये मिळू लागले.

आणखी वाचा : दाक्षिणात्य अभिनेत्री ते खासदार; जाणून घ्या नवनीत राणा यांच्याविषयी खास गोष्टी

नुकतीच सुचिस्मिताने आजतकला मुलाखत दिली. त्यावेळी ती म्हणाली, ‘शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी ओडिसामध्ये साइन इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. त्यानंतर २०१५मध्ये मी मुंबईत आले. बॉलिवूडमध्ये मला हळूहळू काम मिळू लागले. सहा वर्षे मी असिस्टंट कॅमेरा पर्सन म्हणून काम केले. पण करोना आला आणि माझे संपूर्ण आयुष्य बदलले.’

आर्थिक परिस्थितीविषयी बोलताना पुढे ती म्हणाली, ‘माझ्याकडे मुंबईहून ओडिसाला घरी परत येण्यासाठी देखील पुरेसे पैसे नव्हते. अमिताभ बच्चन आणि सलमान खानने माझी आणि माझ्या पूर्ण टीमची मदत केली. लॉकडाउनमुळे सेविंग देखील संपली होती आणि काम मिळेल असे देखील वाटत नव्हते. बॉलिवूडमध्ये पुन्हा काम मिळवण्याचा प्रयत्न केला पण तो देखील अयशस्वी ठरला.’