13 August 2020

News Flash

हिंदी चित्रपटाचा प्रवास : स्वप्नरंजनाकडून चरीत्रपटाकडे

#10YearsChallenge २००८ ते २०१८ या दशकातलं हिंदी चित्रपटसृष्टीचं वैशिष्ट्य

– दिलीप ठाकूर

आपल्या हिंदी चित्रपटाची पहिली ओळख काय? तर प्रेक्षकांचे दोन घटका मनोरंजन करणे. काळ कितीही बदलला तरी हे वैशिष्ट्य त्यात कायमच राहिलय. पण सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या काळात खोलवर रुजलेले हे वैशिष्ट्य काही प्रमाणात कायम राहूनच मल्टीप्लेक्स युगात बरेच बदललयं हेच २००८ ते २०१८ या दशकाचे हिंदी चित्रपटाचे विशेष होय. या बदलाचा आताचा वेगही भन्नाट आहे.

या दशकात संख्येने चित्रपट निर्मितीचे वार्षिक प्रमाण कायम राहिलय. तर यशाची बदललेली परिभाषा स्थिरावली. फार पूर्वी यशस्वी चित्रपट अनेक शहरात एका चित्रपटगृहात चक्क पंचवीस, पन्नास आठवडे तर कधी त्याहीपेक्षा जास्त काळ मुक्काम करे. कालांतराने हिट चित्रपट पन्नास दिवस जरी मुक्कामाला राहिला तरी बरीच मोठी मजल वाटे. या दशकातील सर्वात मोठा बदल म्हणजे, पहिल्या काही दिवसातच ( मोठा चित्रपट असेल तर पहिले दोन तीन आठवड्यात) घसघशीत कमाई करुन त्याचीच बातमी होऊ देणे. पूर्वी चित्रपटाच्या गुणदोषांवर खोलवर होणारी चर्चा कार्पोरेट युगात इकाॅनाॅमीत होऊ लागली. आणि एखादा चित्रपट पाहणारा भेटण्यापूर्वीच त्याने चक्क शंभर कोटी कमावल्याच्या बातम्या येऊ लागल्या. याच काळात अनेक चित्रपट पहिल्याच शुक्रवारी जगातील किमान पन्नास देशात प्रदर्शित होऊ लागले. तरी जगात हिंदी चित्रपटाची खरी ओळख काय याचे उत्तर याही काळात मिळाले नाही.

एकीकडे अशी व्यवसायवृध्दी होत असतात चित्रपटातील प्रगतीकडे पाह्यचे तर या दशकात काही ठळक गोष्टी दिसताहेत. मूळचा मसालेदार मनोरंजक चित्रपट कायम राहिलाय (उदा. सिंग इज किंग, दबंग, सिम्बा), पण त्याच वेळी इतरही काही वैशिष्ट्ये रुजली. अर्थात त्याही चित्रपटांनी मनोरंजनच केले, पण त्याचे स्वरूप वेगळे होते. जोधा अकबर (2008) ते पद्मावत (2018) असा तो प्रवास आहे. आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साली यांनी हे भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपटांचे सातत्य ठेवले. पण काही वादही रंगले. मस्तानी आणि काशीबाई कधी एकत्र नृत्य करतीलच कशा हा प्रश्न सडेतोड होता. (बाजीराव मस्तानी) पण सिनेमॅटीक लिबर्टी म्हणून अशी तडजोड केली गेली. करणी सेनेने अतिशय आक्रमक विरोध केल्यानेच ‘पद्मावती ‘चे ‘पद्मावत’ झाले. अशा चित्रपटांनी ऐतिहासिक काळाबाबत जाणून घेण्याची समाजात भावना वाढली. तशी पुस्तकेही विकली गेली. अशा भव्य चित्रपटात बाजी मारली ती ‘बाहुबली ‘च्या पहिल्या आणि दुसरा भाग खणखणीत यशस्वी ठरल्याने! या चित्रपटांव्दारे व्हीएफएक्स अर्थात भरपूर तांत्रिक करामती वाढल्या. बराचसा चित्रपट कॅम्प्युटरवर आकार घेऊ लागला. दक्षिणकडील हे फॅण्टसी चित्रपट हिंदीतही डब होऊन प्रदर्शित होण्याचा ट्रेण्ड याच दशकात कमालीचा रुजला. पूर्वी एकाद्या तमिळ वा मल्याळम भाषेतील चित्रपटाची हिंदी डब आवृत्ती काही वर्षांनी येई. पण आता रजनीकांत (2.O, पेट्टा, काला), कमल हसन (विश्वरुपम) यांचे प्रादेशिक चित्रपट हिंदीत डब होऊन प्रदर्शित होऊ लागले. या दशकात हा व्यवसाय असाही पसरला. मल्टीप्लेक्समधील मोठ्या प्रमाणातील स्क्रीन त्यासाठी पथ्यावर पडले.

आशयपूर्ण छोट्या चित्रपटांची याच काळात निर्मिती वाढताना समांतर चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट यातील अंतर जवळपास संपले. पूर्वी समांतर अथवा कलात्मक चित्रपट हे बुद्धिवादी प्रेक्षकांसाठीच आहेत असे मानले जाऊन ते फक्त मोठ्या शहरात काही विशिष्ट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आणि जगभरातील महोत्सवात दाखल होत. उदा. आक्रोश, निशांत. आता त्याची मांडणी अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असावा अशी असते. वेन्सडे (2008) ते तुंबाड (2018) असा त्याचा खूपच मोठा उल्लेखनीय प्रवास आहे. त्यामुळे अनेक विषय येऊ लागले. प्रेक्षकांना काय आवडते याचा विचार करून मग चौकटीतच फिरत राहणे कमी होऊन विविध विषयांवर फोकस टाकतच प्रेक्षकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न वाढला. लंच बाॅक्स, विकी डोनर, देव डी, बर्फी न्यूटन, स्पेशल छब्बीस असे अनेक चित्रपट आले. त्यात पुन्हा आणखीन एक गोष्ट घडली, उत्तर भारतातील छोट्या शहरातील पाश्वभूमीवर अनेक चित्रपट येऊ लागले. आरक्षण ते मुल्क असा हा प्रवास आहे. टाॅयलेट एक प्रेमकथा, सुई धागा असे सरकारी धोरणाना रंगवत मांडणारे चित्रपट आले. यांचा निर्मिती खर्चही अफाट वगैरे नसल्याने यात व्यावसायिक धोकाही कमी असतो.

रिमेक (अग्निपथ), सिक्वेल (गँग्ज ऑफ वासेपूरचे एकाच वर्षी दोन भाग आले. आणि रसिकांनी ते स्वीकारलेही), भूतपट (फूंक), हाॅट मसाला (मर्डर ३) असे करता करता मल्टीप्लेक्सचा सिनेमा असा एक प्रकार रुजला. पिपली लाईव्ह, शोर इन द सिटी, लव्ह सेक्स धोका, काय पोछे, कहानी अशी काही उदाहरणे देता येतील. राजकीय चित्रपटाचेही सातत्य राहिलय (इंदू सरकार) अशा चित्रपटांवर माध्यमातून भरपूर चर्चाही रंगली. हे घडत असतानाच जुनी किती तरी एकपडदा चित्रपटगृहे बंद होत गेली आणि अगदी छोट्या शहरातूनही (सातारा इत्यादी) मल्टीप्लेक्सची संख्या वाढली.

या काळात चरित्रपटांचा प्रवास रंगला हे वैशिष्ट्य. या दशकाच्या उतारार्धात ते सुरु झाले आणि आता रुजलेही. भाग मिल्खा भाग, डर्टी पिक्चर्स, एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी इत्यादी चरित्रपटांनी हे रुजवले. पिरिआॅडिकल चित्रपटही रुजला (गोल्ड). या दोन्ही प्रकारच्या चित्रपटासाठी भरपूर संशोधन, वाचन, मेहनत आणि वातावरण निर्मिती हे महत्वाचे घटक असतात. मेकअपनपासून कला दिग्दर्शकापर्यंत सगळ्यांनाच आपल्या कलेचा दर्जा उंचवावा लागतो. त्यासाठीची मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तयारी वाढली हे याच दशकाचे महत्वाचे विशेष.

एव्हाना तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या काळात ‘खान’दानी एस्टॅब्लिश हिरोंची वाटचाल आणि यशाचे सातत्य कसे राहिले? दिवाळी (शाहरूख), ईद (सलमान) आणि वर्षअखेर अथवा ख्रिसमस (आमिर) अशी जणू त्यांनी वाटणी करून घेत वाटचाल तर केली. एखाद्या वेळेस त्यात बदलही झाला. पण असे ‘रिलीज स्पाॅट’ पक्के असले तरी चित्रपट चांगलाच हवा असा याच खानच्या काही चित्रपटाना स्पष्टपणे नाकारत प्रेक्षकांनी जणू आपला अधिकार वापरला. ट्यूबलाईट, ठग्ज ऑफ हिन्दुस्तान, झीरो ही उदाहरणे पुरेशी आहेत. तिघांनीही आपला टिकवलेला स्टारडम आता उतारावर असताना आपले वय आणि रसिकांच्या आजच्या पिढीची झपाट्याने बदलणारी आवड निवड याची सांगड ते कशी घालतात हे पाह्यचे. प्रेक्षकांना आता रणवीर सिंग जास्त जवळचा वाटतोय, तर रुपाने सामान्य असणारे राजकुमार राव, नवाऊद्दीन सिद्दीकी, आयुष्यमान खुराना जवळचे वाटताहेत. हा एक मोठा बदल ठरावा.

मल्टीप्लेक्सकडून मोबाईल स्क्रीनवर चित्रपटाचा प्रवास सुरू झालाय, टीझर आणि ट्रेलरला विक्रमी लाईक्स मिळाल्या तरी तेवढ्या प्रमाणात प्रेक्षक मिळतीलच असे नाही हादेखील सत्य मान्य करायला हवे. अर्थात प्रत्येक वर्षी खणखणीत यशाचे प्रमाण साधारण पंधरा वीस टक्केच राहिलयं. पण ग्लॅमरच्या मुखवट्यात अपयश कायमच झाकले गेलेय हे सत्य या काळातही कायमच राहिलय.

फार पूर्वी जगण्याची गती धीमी होती, त्यामुळे रसिकांच्या मनात एकेक चित्रपट दीर्घकाळ घर करीत असे. आता थ्री इडियस, दंगल असे सुपर हिट चित्रपटही मागे ठेवून सिनेमा आणि प्रेक्षक (अथवा समाज) पुढे वेगाने प्रवास करताहेत असे जाणवतयं…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2019 3:02 pm

Web Title: bollywood journey from fantasy to biopic
Next Stories
1 Thackeray Review : पडद्यावरचा वाघ साकारण्यात नवाजुद्दीन यशस्वी
2 ..पण बोलायलाच कोणी नाही, आशा भोसलेंची खंत
3 जाणून घ्या, सेलिब्रिटींना कसा वाटला ‘ठाकरे’?
Just Now!
X