परफेक्शनिस्ट आमिर खानच्या चित्रपट कारकिर्दीत बरेच चित्रपट मैलाचा दगड ठरले. त्यातीलच काही चित्रपटांनी आमिरच्या कारकिर्दीला कलाटणीसुद्धा दिली. असाच एक चित्रपट म्हणजे ‘जो जीता वही सिकंदर’. मन्सूर खान दिग्दर्शित ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटाने अनेकांचीच मनं जिंकली. तरुणाईच्या जवळ जाणाऱ्या कथानकामुळे ‘जो जीता…’ खऱ्या अर्थाने एव्हरग्रीन चित्रपट ठरला, असं म्हणायला हरकत नाही. अशा या अफलातून चित्रपटाला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच निमित्ताने फराह खानने ट्विट करत दिग्दर्शक मन्सूर खान यांचे आभार मानले आहेत.

‘मन्सूर खान मी तुमची खरंच खूप आभारी आहे. या इंडस्ट्रीत मला संधी दिल्याबद्दल मी तुमची अभारी आहे…’ असं म्हणत फराहने त्यांचे आभार मानले. जो जीता वही सिकंदरमध्ये फराहने चित्रपटाचं नृत्यदिग्दर्शन केलं होतं. तेव्हापासूनच फराहच्या या इंडस्ट्रीतील प्रवासाला सुरुवात झाली. सध्याच्या घडीला ती बॉलिवूडमधील एक आघाडीची नृत्यदिग्दर्शिका आहे. त्यासोबतच तिने चित्रपट दिग्दर्शनामध्येही काही प्रयोग करत ‘मै हु ना’, ‘हॅप्पी न्यू इयर’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.

‘जो जीता…’च्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा आजच्या दिवशी चाहत्यांनाही या चित्रपटाचं यश त्यांच्या परीने साजरा केलं आहे. १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या ब्लॉकबस्टर चित्रपटात आमिर खान, आएशा झुल्का, मामिक सिंह, दीपक तिजोरी आणि कुलभूषण खरबंदा अशा कलाकारांची फौज पाहायला मिळाली होती. नव्वदच्या दशकात तरुणाईला वेड लावणाऱ्या या चित्रपटाने रसिकांच्या मनात कायमचं घर केलं. आजही हा चित्रपट अनेकांच्या फेव्हरिट लिस्टचा भाग आहे.

वाचा: अमिताभ-आमिरमध्ये रंगलेल्या चर्चेचा विषय तरी काय?