यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर धडकलेल्या ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल ५० दिवस उलटले आहेत. पन्न्साव्या दिवशीसुद्धा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढतच असल्याचं पाहायला मिळत आहे. दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने ३०० कोटींच्या कमाईचा आकडा ओलांडला आहे.

भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘बाहुबली २’, ‘पीके’, ‘बजरंगी भाईजान’ ‘दंगल’ या चित्रपटांमागोमाग ३०० कोटींचा आकडा ओलांडणाऱ्या चित्रपटांमध्ये भन्साळींच्या या अद्वितीय प्रोजेक्टचाही समावेश झाला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘पद्मावत’ची ही उल्लेखनीय कामगिरी ठरत आहे.

करणी सेनेचा वाद, सेन्सॉरचे निर्णय आणि चित्रपटाच्या प्रदर्शनात आलेले सर्व अडथळे दूर करत भन्साळींचा हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्यातून राजपूत संस्कृतीचं वैभवशाली चित्रण पाहायला मिळालं होतं. या चित्रपटात दीपिका पदुकोणने राणी पद्मावतीची, शाहिद कपूरने महारावल रतन सिंहची, तर रणवीर सिंगने क्रूर सुलतान अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारली होती.

https://www.instagram.com/p/BgWAWYyB71S/

भन्साळींच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेसाठी कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतल्याचं पाहायला मिळालेलं. तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटात रणवीरने साकारलेल्या खिल्जीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. समीक्षकांनीही त्याचं कौतुक करत अभिनयाप्रती त्याची समर्पक वृत्ती असामान्य असल्याचं सांगितलं होतं.

वाचा : ‘व्हायरल’ची गंभीर साथ!

‘पद्मावत’ या चित्रपटाने तिन्ही कलाकारांच्या चित्रपट कारकिर्दीला एक वेगळी कलाटणी दिली आहे असं म्हणायला हरकत नाही. दीपिकाच्या कारकीर्दीत १०० कोटींचा आकडा ओलांडणारा ‘पद्मावत’ हा सातवा चित्रपट ठरला आहे. भव्यतेची वेगळी व्याख्या मांडून गेलेला हा चित्रपट त्यातील कलाकरांच्या मानधनामुळेही चर्चेत राहिला होता. शाहिद आणि रणवीरपेक्षा दीपिकाला ‘पद्मावत’साठी सर्वाधिक मानधन देण्यात आलं होतं.