मासिक पाळीच्या दिवसांमध्ये घेतली जाणारी काळजी आणि त्या दिवसांबद्दल असणाऱ्या काही समजुतींबद्दलच्या काही प्रतिगामी विचारसरणीमुळे अक्षरश: गोंधळून जायला होते, असे अभिनेत्री सोनम कपूरने नुकतेच स्पष्ट केले आहे. येत्या काळात सोनम ‘पॅडमॅन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अरुणाचलम मुरुगानंथम यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. महिलांच्या मासिक पाळीच्या वेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेत खेड्यातील महिलांसाठी कमी दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देणाऱ्या अरुणाचलम यांची यशोगाथा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याविषयीच ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सोनमने काही मुद्द्यांचा सर्वांसमोर खुलासा केला आहे. ‘मासिक पाळीच्या विषयावर आधारित चित्रपट साकारण्याची बाब अनेकांनाच खटकली होती. किंबहुना चित्रपटासाठी हा विषय योग्य नसल्याचेही मत अनेकांनी मांडले होते. शहरात राहणाऱ्या मुलींसाठी या गोष्टी अगदी सर्वसामान्य असतात. पण, महेश्वर आणि तिथल्या काही ग्रामीण भागामध्ये आम्ही चित्रीकरण करताना याविषयीचा न्यूनगंड पाहायला मिळाला’, असे सोनम म्हणाली.

‘मला आठवतेय की, मासिक पाळी सुरु असताना आमची आजी मंदिरातही जाऊ द्यायची नाही. इतकेच नव्हे तर स्वयंपाकघर आणि लोणच्याच्या बरण्यांना हात लावण्यासही आम्हाला मनाई होती. शहरात राहूनही आमच्यावर अशी बंधनं घालण्यात येत असतील तर मग, ग्रामीण भागातील मुलींना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागत असेल याचा विचार करा…’, असे सोनम म्हणाली. समाजातील हीच विचारसरणी बदलण्याच्या दृष्टीने ‘पॅडमॅन’ साकारण्यात आला असल्याचे तिने स्पष्ट केले. एका महत्त्वाच्या मुद्द्यावर मनोरंजक पद्धतीने भाष्य करण्यात येणार असून त्या चित्रपटाचा एक भाग होणे हे आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याची भावनाही तिने व्यक्त केली.

वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय…

आर. बाल्की दिग्दर्शित ‘पॅडमॅन’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार मध्यवर्ती भूमिकेत झळकणार असून, अभिनेत्री राधिका आपटेसुद्धा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचही आहे. कारण, बिग बी अमिताभ बच्चनही ‘पॅडमॅन’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.