बरीच आंदोलनं आणि राजपूत करणी सेनेचा विरोध या सर्व परिस्थितीला तोंड दिल्यानंतर आता कुठे ‘पद्मावती’ या चित्रपटाला प्रमाणित करण्याचा निर्णय सेन्सॉरने घेतला होता. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटात काही बदल सुचवत या चित्रपटाच्या नावातही बदल करण्याची विचारणा सेन्सॉरकडून करण्यात आली. सेन्सॉरचा हा निर्णय पाहता, वेगळ्या नावाने का असेना पण ‘पद्मावती’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी अपेक्षा असतानाच आता या चित्रपटाच्या वाटेत आणखी एक अडचण आली आहे. मेवाडच्या राजघराण्यातील सदस्यांनी सेन्सॉरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

सेन्सॉरने ‘पद्मावती’ चित्रपटात सुचवलेल्या बदलांवर मेवाडचे राजघराणे असंतुष्ट असल्याचे स्षष्ट होतेय. चित्रपटाला प्रमाणित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीतील सदस्य अरविंद सिंग मेवाड यांनी सेन्सॉरने चित्रपटाच्या बाजूने दिलेल्या निर्णयावर नाराजीचा सूर आळवला आहे. चित्रपटातील किती दृश्यांवर कात्री लावण्यात आली आहे यापेक्षाही चित्रपटातून इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे, असे मत त्यांनी मांडले.

वाचा : ‘भन्साळींइतकी सहनशीलता माझ्यात नाही’

चित्रपटाविषयीची नाराजी व्यक्त करत मेवाडच्या राजघराण्याने थेट केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे दाद मागितली आहे. या प्रकरणी त्यांनी इराणी यांना एक पत्र लिहिले असून, हा चित्रपट प्रदर्शित झाला तर राजस्थानमध्ये अशांततेचे वातावरण पाहायला मिळेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटाला सुरुवातीपासूनच काही राजपूत संघटनानी विरोध केला होता. या चित्रपटातून भन्साळींनी इतिहासाची चुकीच्या पद्धतीने मांडणी केल्याचे मत अनेकांनी मांडले होते. याच पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही लांबणीवर टाकण्यात आली. पण, तरीही काही केल्या चित्रपटाच्या वाटेतील अडथळे कमी होण्याची नावच घेत नाहीयेत.