News Flash

शब्दांच्या पलीकडले : आजा सनम मधुर चांदनी में हम

आजही हे गाणे आपला गोडवा आणि उत्कटता कायम ठेवून आहे.

सौजन्य - यूट्युब

dilip-thakur-articleप्रेम गीत आणि हिंदी चित्रपट यांच्या नात्याची गाठ अन्य कोणत्याही प्रकारच्या गाण्यांपेक्षा घट्ट आणि बहुस्पर्शी- बहुस्तरीय! अनेक तरी प्रेम गीते जणू आपल्याच मनातील भावना व्यक्त करताहेत असेच वास्तवातील अनेक प्रेमी युगलांना मनोमन वाटते…

आजा सनम मधुर चांदनी मे हम
तुम मिले तो विराने मे भी आ जाऐगी बहार…

नर्गिस डोळ्यासमोर येतानाच राज कपूर देखिल आला ना? अनंत ठाकूर दिग्दर्शित ‘चोरी चोरी’ (१९५८) मधील हे साठीच्या उंबरठ्यावरील गाणे आजही आपला गोडवा व उत्कटता कायम ठेवून आहे. म्हटलतं तर हे जुन्या चित्रपटातील एक गाणे. पण गाण्यातील भावना सर्वकालीन.

कधीही कोणीही व्यक्त कराव्यात अशा…
झुमने लगेगा आसमान…

नर्गिस प्रेमाच्या विलक्षण ओढीने म्हणते आणि राज कपूर देखील तितक्याच उत्कटतेने तिला साथ देतो. एका छोट्याश्या बागेत हे प्रेम गीत खुलते- फुलते- रंगते. खरं तर ती घरातून पळालेली व तिला तो सहप्रवासी भेटतो. ओळख, भांडणे, छेडछाड व मग प्रेम असे हे नाते जुळत जाते. तिला आता अधिकच मोकळीक हवीय. तिच्या भावमुद्रेतून ती सर्वप्रथम व्यक्त होते. ती गाऊ लागते. तो देखील तिच्या सुरात सूर मिसळवतो. प्रेम गीत हा प्रकार राज कपूर व नर्गिस याना एव्हाना सरावाचा झालेला. रुपेरी पडद्यावर उत्कट व कमालीच्या असोशीने प्रेम करताना पहावे ते राज कपूर व नर्गिसलाच.

भीगी भीगी रात मे दिल का दामन थांबले
खोयी खोयी जिंदगी हर पल तेरा नाम ले

तो देखिल खूप सहजपणे आपले प्रेम व्यक्त करतोय. महत्त्वाचे म्हणजे दिग्दर्शकाने दोघांच्या केवळ सहवासातून प्रेम भावना व्यक्त केल्यात. कोठेही कसलेही शारीरिक आकर्षण वा घर्षण नाही. दोघांच्याही भावमुद्रा व देहबोलीतून गाणे गुंतत वा गुंफत जाते. तिला जास्तच प्रेमाची भूक आहे व त्याला तेवढीच त्याची जाणीव आहे. नर्गिसची केशरचना थोडी स्टाईलीश आहे. छान हसत ती आपल्या भावना पुढे नेते व तो देखील जराही घाई न करता तिच्या उमलत्या प्रेमाला प्रतिसाद देतोय,

दिल यह चाहे आज तो
बादल बन उड जाऊ मैं…

प्रेमात स्वप्नाळू होणे काहीसे स्वाभाविक असतेच. राज कपूर थोडासा हसतच तिला अशी आशा दाखवतो. तिला तो खूपच मोठा दिलासा असतो. म्हणूनच तर हे प्रेम गीत आणखीन रंगात येते. विशेष म्हणजे संगीतकार शंकर-जयकिशन नेहमीच राज कपूरला मुकेशचा आवाज देत. पण ‘चोरी चोरी’ची प्रेम गीते मन्ना डेनी गायलीत व ती राज कपूरचे व्यक्तिमत्व व प्रेम गीतातील भावना यांना अगदी चपखल बसली. नर्गिसला अर्थातच लता मंगेशकर यांचा आवाज! तो काळ एक्स्प्रेशन मेलडीचा होता. गाण्याचा भावार्थ कलाकार कोण बरे आहेत याचाच विचार करून स्वरात पकडला जाई. म्हणूनच तर ती गाणी जणू ते कलाकार गातात असेच वाटे. या गाण्यातील नर्गिसच्या बटा देखील छान रोमॅन्टिक भावना व्यक्त करताहेत असेच वाटते….

झुमने लगेगा आसमान
झुमने लगेगा आसमान…
दिलीप ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 1:05 am

Web Title: bollywood music aaja sanam madhur chandni me hum song
Next Stories
1 VIDEO : कंदील बलोचच्या बायोपिकचा टिझर वेगळच सत्य उघड करतोय
2 … म्हणून रणबीरने मागितली गोविंदाची माफी
3 नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘बाबुमोशाय बंदूकबाज’ चा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X