प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. हिमाचल प्रदेशमधील मॅक्लोडगंज येथे त्याचं शरीर मृत अवस्थेत सापडलं. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान आसिफ बसरा यांच्या मृत्यूमुळे सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना जबरदस्त धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “हे कसं शक्य आहे, लॉकडाउनपूर्वीच आम्ही एकत्र काम केलं होतं.” अशा आशयाचं ट्विट करुन मनोज वाजपेयी याने आपलं दु:ख व्यक्त केलं. शिवाय स्वरा भास्कर, हंसल मेहता यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आसिफ बसरा यांचा मृतदेह हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. मात्र आसिफ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अभिनेते आसिफ बसरा हे गेल्या पाच वर्षांपासून मॅक्लोडगंजमध्ये एका मैत्रिणीसोबत भाडे तत्त्वावर घेतलेल्या घरात राहत होते. त्यांची मैत्रिण परदेशी असून ते दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचे म्हटले जाते.

आसिफ हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते होते. १९९८ साली ‘वो’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘जब वी मेट’, ‘नॉक आऊट’, ‘क्रिश ३’, ‘एक व्हिलन’, ‘हिचकी’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘हिचकी’, ‘काय पो छे’ यांसाख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. ते एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या मृत्यूमुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.