मुंबईचा इतिहास काय? जुन्या चित्रपटांमध्येसुद्धा या शहराचे खरे रुप आपल्याला का दिसले नाही? या प्रश्नांनी दिग्दर्शक अनुराग कश्यपला ग्रासले होते आणि यातूनच ‘बॉम्बे वेल्वेट’च्या निर्मितीची प्रेरणा त्याला मिळाली. मुंबई शहर घडण्यामागे एक वेगळा इतिहास आहे. तो तुम्हाला ऑनलाईन वाचता येईल पण, चित्रपटांमध्ये कधी दाखविण्यात आलेला नाही. त्यामुळे तो काळ मला चित्रपटातून साकारायचा होता, असे अनुरागने सांगितले.
मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय महानगर बनण्याकडे वाटचाल कशी सुरू झाली याची मुळं १९६०च्या दशकात आहेत. तस्करी, ब्रिटीशांचे वर्चस्व आणि येथील जिवनशैली याचा चित्रपटात वेध घेण्याचा प्रयत्न केला असल्याचेही अनुरागने पुढे सांगितले.
ग्लॅमर, गुन्हेगारी आणि जीवनशैली यासोबतच चित्रपटाला सुंदर प्रेम कथेची पार्श्वभूमी आहे. जॉनी बलराज, रोझी, कैझाद खंबाटा अशी यातील व्यक्तिरेखांची नावे ट्रेलर्समुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहेत. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे रणबीर कपूर, अनुष्का शर्मा ही स्टार कलावंत जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. त्यापेक्षाही अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे ती या चित्रपटातील करण जोहरच्या प्रमुख भूमिकेची. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर प्रथमच अभिनयात पदार्पण करीत असून तेसुद्धा दुसऱ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून त्याने खलनायकी छटेची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच मुंबईच्या साठीच्या दशकाची सफर घडवून आणेल असा विश्वास अनुरागने व्यक्त केला आहे.