अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर आता कुठे त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य पुन्हा रुळावर येऊ लागलं आहे. दुबईला एका कौटुंबिक समारंभासाठी गेलेल्या श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्व आणि कपूर कुटुंबावर आघात झाला. आज त्या अभिनेत्री आपल्यात नसल्या तरीही त्यांच्या आठवणी आणि कलाकृती आजही त्यांच्या अस्तित्वाची जाणिव आपल्याला करुन देतात. श्रीदेवी यांनी कलाविश्वात दिलेलं योगदान आणि त्यांच्या किरकिर्दीची आतापर्यंतची वैशिष्ट्ये या साऱ्याचा आढावा घेत त्यांचे पती, बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या आयुष्यावर आधारित माहितीपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ते हा माहितीपट बनवण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा होत्याच. पण, आता त्यांनी या माहितीपटासाठी तीन नावं निश्चित केल्याचं म्हटलं जात आहे. ‘डेक्कन क्रॉनिकल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘श्री’, ‘श्रीदेवी’ आणि ‘श्री मॅम’ या तीन नावांना बोनी कपूर यांनी प्राधान्य दिलं असून एका निर्मिती संस्थेसोबत मुव्ही रजिस्ट्रेशन डीपार्टमेंटमध्ये ही तिनही नावं नोंदवली आहेत. त्याशिवाय या यादीमध्ये इतरही काही नावांचा समावेश असल्याचं कळच आहे.

वाचा : त्याने मला स्पर्श करण्यास सुरुवात केली अन्…, कास्टिंग काऊचबाबत मराठी अभिनेत्रींनी केला धक्कादायक खुलासा

सूत्रांचा हवाला देत प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार, श्रीदेवी यांच्या आयुष्यावर आधारित माहितीपट साकारण्यासाठी बोनी कपूर आग्रही असून, त्यांनी त्यादृष्टीने पावलं उचलत या माहितीपटासाठी काही नावं नोंदवली आहेत. श्रीदेवी यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर भाष्य करणाऱ्या या माहितीपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉलिवूडच्या ‘मिस हवाहवाई’चीच जादू प्रेक्षकांवर होणार आहे, असं म्हणायला हरकत नाही.