रुपेरी पडद्यावरचा कवी अशी ओळख बनलेल्या गुरू दत्त यांच्या चित्रपटांची गणना ‘ऑल टाइम क्लासिक’ चित्रपटांमध्ये करण्यात आली. त्यांच्या चित्रपटांची मोहिनी आजही रसिकांना अस्वस्थ करते. गुरू दत्त यांच्या निधनाला १० ऑक्टोबर २०१४ रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त ‘गुरू दत्त’ याच नावाचे पुस्तक तयार करण्यात आले असून त्याचे प्रकाशन सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि गुरूदत्त यांचे जवळचे नातेवाईक असलेले श्याम बेनेगल यांच्या हस्ते केले जाणार आहे.
प्रभात चित्र मंडळ आणि ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम नरिमन पॉइण्ट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील रंगस्वर सभागृहात सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. या पुस्तकाचे संपादन सुधीर नांदगावकर यांनी केले असून अनेक मान्यवरांनी गुरू दत्त यांच्या चित्रपटांमधील विविध पैलूंवर लिहिलेले लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. प्रकाशन कार्यक्रमानंतर गुरू दत्त दिग्दर्शित ‘कागज के फूल’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.