जर्मनीत जाऊन हिटलर विरोधात चित्रपट बनवण्याची हिंमत संजय लीला भन्साळी करु शकतात का? असा सवाल राजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांनी केला आहे. काल राजपूत करणी सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पद्मावती चित्रपटाच्या सेटवर जाऊन तोडफोड केली होती. यावेळी त्यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही मारहाण केली होती.

राजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, आम्ही ‘जोधा-अकबर’च्या वेळी देखील हेच म्हटले होते. जे इतिहासात घडलेच नाही, ते चित्रपटात दाखवले जाऊ नये. संजय लीला भन्साळींमध्ये जर्मनीत जाऊन हिटलरच्या विरोधात चित्रपट बनवण्याची हिम्मत आहे का? आमच्या राजपूत भूमीवर येऊन आमच्या देखतच इतिहासाची छेडछाड केली जात आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी मात्र अद्याप सदर घटनेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, संपूर्ण बॉलीवूड त्यांच्यासाठी एकजूट झाले असून त्यांनी भन्साळींना आपला पाठिंबा दर्शविला आहे.

सदर घटननेनंतर बॉलीवूड जगतातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ‘लज्जास्पद.. याविरोधात काय केले जातेय? अशी लोकशाही काय कामाची,’ असे ट्विट गायिका श्रेया घोषाल हिने केले आहे. तर, बॉलीवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहर याने भन्साळी यांना आपला पाठिंबा दर्शविला असून, त्याने याविरोधात आवाज उठवला आहे. त्याने लिहलेय की, चित्रपटाच्या चित्रीकरणात किंवा प्रदर्शनाच्यावेळी अशा प्रकारचे गोंधळ अनेकदा पाहिले आहेत. यावेळी मी संजयच्या भावना समजू शकतो. मी त्याच्यासोबत आहे. संजय भन्साळीसोबत जे काही झालेय त्याची मला जाणीव आहे. या इंडस्ट्रीचा भाग म्हणून आपण सर्वांनी एकजूट होऊन आपल्या क्षेत्रातील लोकांसोबत सक्षमपणे उभे राहण्याची गरज आहे.

राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चित्रण चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यामुळे राजपूत करणी सेनेकडून हा विरोध करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर सदर घटनेचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये राजपूत करणी सेनेचे कार्यकर्ते चित्रपटाच्या सेटवर चित्रिकरणाच्या सामानाची फेकाफेक करताना दिसत आहेत.