बॉलिवूडमधील आघाडीची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यावर फसवणूकप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे. एका स्टेज शोसाठी पैसे घेऊनही शो केला नसल्याचा तिच्यावर आरोप आहे.


उत्तर प्रदेशातील काटघर पोलीस ठाण्यात सोनाक्षीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तीने एका स्टेज शोसाठी आयोजकांकडून २४ लाख रुपये घेतले होते मात्र, कार्यक्रम केला नव्हता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनाक्षीला ताब्यात घेण्यासाठी काल उत्तर प्रदेश पोलीस सोनाक्षीच्या मुंबईतील घरी पोहोचले, मात्र ती घरी नव्हती. फसवणूक केल्याप्रकरणी तिच्यावर भादंवि कलम ४२० आणि ४०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाक्षी बॉलिवूडचे शॉटगन आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. यंदा लोकसभा निवडणुकीदरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह त्यांचे कुटुंबीय बरेच चर्चेत राहिले होते. भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन त्यांच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर त्यांच्या पत्नीला समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून उमेदवारी दिली होती.

यावेळी सोनाक्षी आपल्या आई-वडिलांच्या प्रचारार्थ सभांमध्ये सहभागी झाली होती तसेच आपल्या विधानांमुळे ती अनेकदा चर्चेतही आली होती.