रामनवमीच्या मुहूर्तावर सेन्सॉरच्या नव्या कार्यालयाचे अनावरण होत असून या कार्यक्रमाचे उद्घाटन बॉलिवूडचे शहेशाह अमिताभ करणार आहेत. भारतीय चित्रपटांना प्रमाणपत्र देणाऱ्या सेन्सॉर बोर्डाचे मुंबईतील कार्यालय आता नव्या जागी स्थलांतरित करण्यात आले आहे. फिल्म बिल्डिंग, जी देशमुख मार्ग, पेडर रोडवर स्थलांतरित झालेल्या या कार्यालयाचे अनावरण अमिताभ करणार असल्याचे संकेत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी दिले आहेत.
कार्यालयाच्या स्थलांतरानंतर  निहलानी म्हणाले की, “अमिताभ बच्चन हे चित्रपटसृष्टीतील शहेशाह आहेत. त्यांच्याशिवाय अन्य कोणतीही व्यक्ती नव्या कार्यालयाचे अनावरण करण्यासाठी पात्र वाटत नाही. बच्चनसाहेब सर्वगुण संपन्न अभिनेता असून ते हिंदी चित्रपटसृष्टीचे प्रतिनीधीत्व करतात. त्यामुळेच सेन्सॉरच्या नव्या कार्यालयाच्या अनावरणासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.” अमिताभ यांनी कोणतेही कारण न देता निमंत्रण स्वीकारल्याचेही निहलानी यांनी सांगितले.
सेन्सॉर बोर्डाने हा कार्यक्रम आज सायंकाळी ४ वाजता होणार असून अमिताभ बच्चन यांच्याशिवाय बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमार, अजय देवगण आणि गोविंदा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे समजते.

अमिताभ यांच्या विषयी बोलायचे तर, ते सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असल्याचे दिसते. त्यामुळेच चित्रपटांशिवाय ट्विटरच्या माध्यमातून ते चाहत्यांना भेटत असतात. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांच्या आगामी चित्रपटाविषयी सांगायचे तर, त्यांचा ‘सरकार ३’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ७ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

रामनवमीच्या मुहूर्तावर होणाऱ्या सेन्सॉरच्या कार्यक्रमासंदर्भात पहलाज यांनी स्पष्टीकरण दिले असले, तरी अमिताभ यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. त्यामुळे पहलाज यांचे निमंत्रण स्वीकारुन, चित्रपटांना कात्री लावणाऱ्या सेन्सॉरच्या नव्या कार्यालयाच्या अनावरणाची  रिबीन अमिताभ यांच्या हस्ते  कापली जाणार ? हे पाहणे उत्सुकतेचे असेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक मंडळी उपस्थित राहणार असल्याचे समजते.