चित्रपटांना कुठे-कुठे आणि कशासाठी कात्री लावावी, यावरून सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांमध्येच असलेला गोंधळ आणि त्यामुळे थेट पदाधिकाऱ्यांनाच द्यावे लागलेले राजीनामे या सगळ्या प्रकरणाचा धुरळा खाली बसायच्या आतच बोर्डाच्या नव्या अध्यक्षांनी नवा फतवा काढला आहे. ‘सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’चे नवे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी सर्व चित्रपट निर्माते आणि बोर्डाच्या प्रादेशिक कार्यालयांना ‘हे अपशब्द वापरू नयेत..’ अशी एक यादीच पाठवली आहे. काही अपशब्द अजूनही चित्रपटांमधून राजरोसपणे वापरले जातात. हा प्रकार थांबवण्यासाठी ही जलद कार्यवाही करण्यात येत असल्याचे या जाहीर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या वतीने इंग्रजी भाषेतील १३ अपशब्द तर हिंदी भाषेतील प्रचलित शिव्यांसह द्वयर्थी संवाद, शब्द, स्त्रियांवरील अत्याचारांसंदर्भातील काही शब्द हलगर्जीपणे वापरले जाऊ नयेत, अशी अपशब्दांची जंत्रीच सादर करण्यात आली आहे. यात इंग्रजी भाषेतील ‘बास्टर्ड’ या शब्दापासून ते िहदी सिनेमात ऐकून ऐकून सवयीचे झालेले ‘हरामखोर’, ‘हरामी’, ‘कुत्ते’ अशा अपशब्दांचा समावेश आहे. याशिवाय, सरकारी नियमानुसार यापुढे कुठल्याही चित्रपटात मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा केला जाऊ नये, हेही या यादीत विशेषत्वाने नमूद करण्यात आले आहे. चित्रपट प्रौढ विभागासाठी प्रमाणित होणारा असला तरीही बोर्डाच्या यादीतील कुठलेही शब्द त्या चित्रपटात नसतील, याची काळजी घेण्याची सूचना सर्व प्रादेशिक विभागातील बोर्डाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक अशा सर्वच भाषांतील चित्रपटांना वरील नियम लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सोशल मीडियावरून टीका
या फतव्यावर सोशल मीडियात टीका होत आहे. बोर्डाने जाहीर केलेली यादी याआधी अमलात आली असती तर अभिनेता धर्मेद्रचा एकही चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नसता, अशा मार्मिक शेरेबाजीपासून ते असेच नियम लादायचे असतील तर बोर्डाच्या प्रमाणपत्रांना अर्थच कुठे उरतो?, अशा प्रकारची गंभीर टीकाही सोशल मीडियावरून होत आहे.