अचूक वेळी आणि अचूक ठिकाणी धक्कातंत्राचा वापर नाटकाच्या उत्कंठेत भर घालतो. शेवटी सामाजिक संदेश देण्याचा केलेला प्रयत्न ओढूनताणून वाटत नाही. म्हणूनच हे नाटक प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडतं.

मराठी रंगभूमी प्रयोगशील आहे. नवीन प्रयोग करून पाहण्यास ती कचरत नाही आणि तो नवा प्रयोग रसिकांना आवडला तर नाटय़रसिक त्या नव्या प्रयोगासकट नाटकाला डोक्यावर घेतात. या रंगभूमीने सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, विनोदी आणि कौटुंबिक नाटके ज्या खुबीने आपल्या अंगाखांद्यावर खेळवली, तितक्याच समर्थपणे गूढ, धक्कातंत्र देणारी नाटके प्रेक्षकांना दिली. आता एका वेगळ्या नाटय़ संकल्पनेची प्रयोगशीलता जोखण्यासाठी ‘अवनीश प्रॉडक्शन्स’ निर्मित ‘छडा’ हे नाटक प्रेक्षकांसाठी रंगभूमीवर आलेय.

‘छडा’ हे नाटक भावनांच्या सुसूत्रतेची काळ्या-पांढऱ्या मनांची सुरेख गुंफण आहे. हे नाटक पाहताना प्रेक्षक कुण्या एका पात्राच्या बाजूने नसतो, तर तो नाटकाच्या बाजूने असतो. प्रेक्षकाला कुण्या एका पात्राची निवड करण्याचे स्वातंत्र्य जरूर असते, पण तो नाटकात गुंतत गेल्याने ‘जे समोर घडेल ते योग्य’ या मानसिकतेपर्यंत येऊन पोहोचतो. परिणामी प्रेक्षक स्वत: एका शोधकार्यात सामील झाल्याचा अनुभव त्याला बसल्या जागी मिळतो. नाटकादरम्यान प्रेक्षकांना धक्के बसतात, पण ते धक्के अर्थपूर्णरीतीने घडवण्यात आल्याने प्रयोगाअंती प्रेक्षकांच्या मनात कुठेच प्रश्नचिन्ह राहत नाही. थोडक्यात कोऱ्या मनाची पाटी घेऊन आलेल्या प्रेक्षकांच्या पाटीवर अनेक समीकरणे मांडून दिली जातात आणि ते गणित कठीण करीत करीत अचानक एका पायरीवर सोपे करून मनावरचे ओझे हलके झाल्याचा अनुभव घेऊन तो नाटय़गृहाबाहेर पडतो.

नाटकाचं कथानक एका अदृश्य पात्राभोवती वलय निर्माण करण्यास यशस्वी ठरतं. िहदी मालिका सृष्टीतील एक अभिनेता अजूनही म्हणावं तसं यश न मिळाल्याने असमाधानी आहे, अशा अभिनेत्याकडून आणि त्याच्या पत्नीकडून अप्रिय अशी घटना घडून त्याभोवती हे नाटक फिरतं. त्या घटनेचा शोध घेत, त्या निमित्ताने त्यांच्याभोवती सामील झालेली पात्रं नाटकाला अधिक गूढ आणि रहस्यमय करतात. नाटकात होत असलेल्या धक्कातंत्राचा वापर, अर्निबध आणि अनिर्णित घटनांचा मागोवा तसेच दृश्य अदृश्य खेळाची साथ अशा त्रिसूत्री सज्जड कथानकाने सुदृढ असलेलं नाटक म्हणजे ‘छडा’.

तिसरी घंटा झाल्यावर पडदा उघडण्याआधीच नाटकाच्या अनाऊन्समेन्टमधून प्रेक्षकांना एक धक्का मिळतो. आणि नाटकात काय काय असू शकतं याचा अंदाज लावायला सुरुवात होते. पडदा उघडताच प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य नेत्र दिपवून टाकतं. एका िहदी अभिनेत्याचा बंगला कसा असू शकतो याचं हुबेहूब चित्रण त्यांनी केलंय. तो बंगला साक्षात आपल्या समोर आहे आणि आपण त्याच्या आवारात उभे राहून घटनाक्रम पाहतोय असा भास प्रेक्षकांना करून देण्यात नेपथ्यकारांना यश आलंय. नेपथ्यामधील सूक्ष्म तपशील विशेष लक्ष वेधून घेतात. प्रकाशयोजनेतही नाटक उजवं ठरलंय. अचूक रंगसंगती, प्रसंगानुरूप केलेली प्रकाशाची अचूक मांडणी आणि धक्कातंत्राच्या वेळी प्रेक्षागृहालादेखील दचकवील अशी प्रकाशयोजना सुखद अनुभव देऊन जाते. फक्त टेलिफोनवरील लाइट खूपच खटकतो. बऱ्याचदा तो प्रेक्षकांचं लक्ष विचलित व्हायला कारणीभूत ठरतो, असं वाटत राहतं. पण बाकी प्रदीप मुळ्ये यांची प्रकाशयोजना उत्तम. रहस्यमय आणि गूढ प्रसंगांना अचूक संगीत देऊन प्रेक्षकांना सांगीतिक धक्के देण्यात संगीतकार राहुल रानडे यांना यश आलंय.

शेखर हे िहदी अभिनेत्याचं पात्र साकारणाऱ्या सौरभ गोखले याने भूमिकेस साजेसा अभिनय केला आहे. मात्र काही प्रसंगात त्याची अभिनयातील कृत्रिमता जाणवते. विशेषत घाबरण्याचे काही प्रसंग त्याच्या अभिनयाला अधिक वाव देऊ शकतात. पण िहदीतील एक तिरसट अभिनेता, नकारात्मक भूमिका असलेलं पात्र रंगवण्याचा त्याने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मानसी कुलकर्णी आणि रेश्मा रामचंद्र या अभिनेत्रींचा अभिनय प्रसंगानुरूप बहरलाय. नेहा हे पात्र साकारणाऱ्या वेदांगी कुळकर्णी या अभिनेत्रीचा अभिनय मात्र बालिश वाटतो. ती व्यक्तिरेखा वयाने काहीशी लहान दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी एवढा मिळमिळीतपणा अपेक्षित नाही. लेखक सुरेश जयराम यांनी नाटकाचे संवाद आणि लेखन उत्कृष्ट लिहिले असून त्यांचा एकुणातला अनुभव नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. नाटकाचं दिग्दर्शनही अचूक झालं असून दिग्दर्शनाच्या बाबतीत कसलीच उणीव भासत नाही. कुठलंच पात्र कुठेही एका बाजूला न झुकता ते प्रमाणबद्ध राहतं. त्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा अधिकार प्रेक्षकांना असतो. सगळ्या पात्रांच्या सगळ्याच बाजू प्रेक्षकांना पटू लागतात आणि मग प्रेक्षक योग्यायोग्याच्या संभ्रमात पडतो. हीच संकल्पना यशस्वीरीत्या हाताळण्यात दिग्दर्शक मंगेश कदम यांना यश आलंय. धक्कातंत्राचा अचूक वेळी आणि अचूक ठिकाणी वापर नाटकाच्या उत्कंठतेत भर घालतो. नाटकाच्या शेवटी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न जरूर केला आहे, पण तो कुठेही ओढून ताणून केलेला वाटत नाही. म्हणूनच हे नाटक सामाजिक संदेश नकळत पोहचवतं आणि प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडतं. काही भय प्रसंगांसाठी तंत्रज्ञ आणि दिग्दर्शकाने केलेली करामत आणि मेहनत वाखाणण्याजोगी आहे. वेशभूषासुद्धा विशेष लक्षवेधी आणि ताजीतवानी वाटते.

एकूणच एक उत्तम ‘सस्पेन्स थ्रिलर’ पाहायचा असेल आणि मानसिक रोलर कोस्टर राईडचा अनुभव घ्यायचा असेल तर जवळच्या नाटय़गृहात हे नाटक केव्हा लागतंय याचा ‘छडा’ लावायला हरकत नाही.

नाटकाचे नाव झ्र् छडा, लेखक – सुरेश जयराम, दिग्दर्शक – मंगेश कदम, नेपथ्य व प्रकाशयोजना – प्रदीप मुळ्ये, संगीतकार – राहुल रानडे, कलाकार – सौरभ गोखले, रेश्मा रामचंद्र, मानसी कुलकर्णी, वेदांगी कुळकर्णी
सौजन्य – लोकप्रभा