करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर जाहीर झालेला लॉकडाउन यांमुळे भविष्यातील सर्वच प्लान्स रद्द झाले. जवळपास तीन महिन्यांहून जास्त काळ लोक आपापल्या घरीच आहेत. अशा वेळी घरी बसून काय करावं हा प्रश्न अनेकांना पडला. काहींनी घरी स्वयंपाकाचे विविध प्रयोग केले तर काहींनी ऑनलाइन क्लासेस लावले. अशातच एका तरुणाने लॉकडाउनमध्ये अनोखी युक्ती लढवली. संगीताची प्रचंड आवड असलेल्या चैतन्य गाडगीळ या तरुणाने देशातच नाही तर परदेशातील लोकांनाही ऑनलाइन क्लासेसद्वारे गिटारवर बॉलिवूड म्युझिक शिकवायला सुरुवात केली. चैतन्यमुळे भारताबाहेरील लोकांनाही बॉलिवूड संगीताची आवड निर्माण झाली आहे.

२०१० मध्ये नोकरीनिमित्त मुंबईत आलेल्या चैतन्यने २०१२ पासून संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. अनेकजण संगीत हा छंद म्हणून जोपासतात. पण नरेंद्र साळसकर यांच्यासारखे गुरू मिळाल्यावर संगीत क्षेत्रात करिअरसुद्धा होऊ शकतं हे त्याला समजलं. नोकरी करत गिटार शिकणं अवघड होत असल्याने चैतन्यने नोकरी सोडून पूर्णवेळ फ्रीलान्स गिटारिस्ट म्हणून प्रवास सुरू केला. मुंबईसारख्या शहरात फारशी ओळख नसल्याने आधी शोज मिळणं कठीण होतं. पण त्या परिस्थितीतून मार्ग काढत गिटार शिकता शिकता त्याने इतरांनाही शिकवायला सुरुवात केली.

दूरदूरवरील विद्यार्थ्यांना सहज शिकता यावं यासाठी चैतन्यने ऑनलाइन क्लासेस घेण्यास सुरुवात केली. त्याच्या या ऑनलाइन क्लासेसना देशभरातून चांगला प्रतिसाद मिळू लागला. उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी चैतन्यकडून ऑनलाइन गिटार शिकण्याची उत्सुकता कायम ठेवली.

लॉकडाउनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा यासाठी चैतन्यने परदेशातील संगीतप्रेमींना ऑनलाइन गिटार शिकवण्यास सुरुवात केली. चैतन्यच्या या कल्पनेला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 7th String Studio अंतर्गत जगभरातून १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलंय. भारतातील मुंबई, दिल्ली, गुरुग्राम, अहमदाबाद, पुणे, नागपूर या शहरांमध्ये त्याचे विद्यार्थी असून भारताबाहेर दुबई, अमेरिका, कुवैत, युके, न्यूझीलंड या देशांमध्येही त्याचे विद्यार्थी आहेत.

चैतन्यने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन व आयुषमान खुरानाच्या ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटातही ‘प्रमुख इलेक्ट्रीक गिटारिस्ट’ म्हणून काम केलंय. याचसोबत त्याने ‘चला हवा येऊ द्या’सारख्या लोकप्रिय कार्यक्रमातही गिटारिस्ट म्हणून काम केलंय. लॉकडाउनमध्ये चैतन्य विनोदवीर सागर कारंडेलाही ऑनलाइन क्लासद्वारे गिटार शिकवतोय.

अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या- www.7thstringstudio.com