ज्येष्ठ अभिनेते मामा पेंडसे, मा. दत्ताराम, भालचंद्र पेंढारकर, चित्तरंजन कोल्हटकर या दिग्गजांचा सहवास आणि त्यांच्यासमवेत काम करण्याचा संधी त्यांना मिळाली. केवळ संगीत रंगभूमीवर ‘गायक अभिनेता’ म्हणून नव्हे तर संगीतिका, फार्स, ऐतिहासिक, गद्य नाटकांतून विविध भूमिका त्यांनी साकारल्या. वयाच्या ८२ व्या वर्षांत असलेल्या या रंगभूमीच्या उपासकाच्या योगदानाची दखल राज्य शासनानेही घेतली. राज्य शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार ज्यांना नुकताच जाहीर झाला ते ज्येष्ठ गायक व अभिनेते चंद्रकांत ऊर्फ चंदू डेग्वेकर आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी आहेत.

गप्पांची सुरुवात साहजिकच या ‘जीवनगौरव’ पुरस्कारानेच झाली. संगीत रंगभूमीवरील माझ्या कामाची योग्य ती दखल घेऊन शासनाने या मानाच्या पुरस्कारासाठी माझी निवड केली ही आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. हा पुरस्कार मी माझ्या कुटुंबाला अर्पण करतो. पुरस्कारासाठी निवड झाल्याने आजवर केलेल्या कामाचे खऱ्या अर्थाने चीज झाले असे वाटते. पुरस्कार माझ्या संगीत रंगभूमीवरील कारकीर्दीसाठी दिला गेला असला तरी केवळ गायन आणि अभिनय एवढय़ापुरतीच मराठी संगीत रंगभूमी मर्यादित नाही. याही पलीकडे संगीत रंगभूमीची व्याप्ती आहे. त्यामुळे संगीत रंगभूमीचा सर्वागाने व व्यापकपणे विचार व्हावा, अशी अपेक्षा डेग्वेकर यांनी व्यक्त केली.

Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
pune digitization, digitization social and political documents pune
पुण्यातील दीडशे वर्षांच्या सामाजिक-राजकीय दस्तऐवजाचे ‘डिजिटायझेशन’; पुणे सार्वजनिक सभेचा पुढाकार, निधीची मात्र चणचण
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

डेग्वेकर यांचे मूळ घराणे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. डेग्वेकर यांचा जन्मही इथलाच. इंग्रजी तिसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण श्रीवर्धन येथेच झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. गिरगाव येथील विल्सन हायस्कूल येथे त्यांचे पुढील शिक्षण झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ‘मॅट्रिक’ झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी छोटी-मोठी कामे केली. पुढे ‘सीटीओ’ (पोस्ट अ‍ॅण्ड टेलिग्राफ)मध्ये त्यांना ‘फोनोग्राम ऑपरेटर’ म्हणून नोकरी लागली. ही नोकरी करत असतानाच के.सी. महाविद्यालयातून त्यांनी ‘इंटर’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.  हरी डेग्वेकर हे त्यांचे वडील. त्यांना भजनाचे वेड होते. त्यामुळे घरात लहानपणापासूनच गाणी, भजने त्यांच्या कानावर पडत गेली आणि तोच संस्कार त्यांच्यावर झाला. लहानपणी वडिलांनी त्यांना छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांतून अभंग म्हणण्यासाठी पाठविले. त्यामुळे स्टेजवर उभे राहण्याची, वावरण्याची त्यांची भीती लहानपणीच गेली. गणेशोत्सवात वेगवेगळ्या नाटकांतून त्यांनी कामेही केली. गिरगावातील गायवाडी येथील बंडोपंत रानडे यांच्याकडे ते काही काळ गाणेही शिकले. त्या वेळी काही संगीत नाटकातूनही त्यांनी छोटय़ा-मोठय़ा भूमिका केल्या होत्या.

व्यावसायिक रंगभूमीवरील पदार्पण आणि अन्य नाटकांविषयी माहिती देताना डेग्वेकर म्हणाले, संगीत नाटकांतून काम करणारे गायक अभिनेते हे (अर्थात काही सन्माननीय अपवाद वगळता) अभिनयाच्या बाबतीत ‘ठोकळा’ असतात, असा एक समज-गैरसमज होता. त्यामुळे संगीत रंगभूमीवर काम करत असलो तरी ‘गायक-अभिनेता’ म्हणून नव्हे तर ‘अभिनेता’ म्हणून स्वत:ला सिद्ध करायचे, असे मी मनाशी ठरविले होते. त्यासाठी राज्य नाटय़ स्पर्धेत मराठा मंदिर कला केंद्र या संस्थेने सादर केलेल्या आणि बाळ कोल्हटकर यांनी गाजविलेल्या ‘मुंबईची माणसे’ या नाटकातील ‘वसंत’ ही वेगळी भूमिका साकारली. या भूमिकेसाठी मला राज्य नाटय़ स्पर्धेचे व चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिकही मिळाले. माझी ही भूमिका ‘नाटय़संपदा’ या संस्थेच्या तीन मालकांपैकी एक असलेल्या मोहन वाघ यांनी पाहिली होती. त्यांनी माझे नाव ज्येष्ठ पत्रकार-नाटककार विद्याधर गोखले यांना सुचविले आणि मला गोखले यांच्या ‘मदनाची मंजिरी’ या नाटकातील ‘चक्रदेव’ ही भूमिका मिळाली आणि येथूनच माझ्या व्यावसायिक रंगभूमीवरील कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १९६७ मध्ये ‘ललितकलादर्श’चे भालचंद्र पेंढारकर यांनी त्यांच्या नाटय़संस्थेत मला बोलाविले आणि ‘ललितकलादर्श’शी कायमचा जोडला गेलो. या संस्थेत गेल्या ३५ वर्षांत मी अनेक संगीत व अन्य गद्य नाटके केली. आजवरच्या माझ्या नाटय़ कारकीर्दीत मला भालचंद्र पेंढारकर आणि मा. दत्ताराम यांचे गुरू म्हणून तसेच नाना संझगिरी, आत्माराम भेंडे, नंदकुमार रावते, मो. ग. रांगणेकर, दामू केंकरे, विजया मेहता, कमलाकर सोनटक्के, अरविंद देशपांडे आणि दाजी भाटवडेकर या दिग्गजांचेही मार्गदर्शन मिळाले. ‘ललितकलादर्श’साठी ‘बावनखणी’ हे मी केलेले शेवटचे नाटक. यात स्वत: भालचंद्र पेंढारकर यांच्यासह माया जाधव, नयना आपटे, फैयाज, शहाजी काळे, नारायण बोडस, अरविंद पिळगावकर आदी कलाकार होते. माझ्या नाटय़प्रवासातील सर्वात जास्त नाटके मी ‘ललितकलादर्श’, ‘रंगशारदा’, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ या नाटय़संस्थांमधून केली. ‘भरत नाटय़ मंदिर’ (पुणे) यांच्याही अनेक नाटकांमधून मी सहभागी झालो होतो.

डेग्वेकर यांनी आत्तापर्यंत सुमारे ५० संगीत, सामाजिक, ऐतिहासिक नाटके तसेच फार्समधून विविध भूमिका साकार केल्या आहेत. ‘शारदा’ (कांचनभट), ‘सौभद्र’ (बलराम), ‘मृच्छकटीक’ (शकार), ‘मानापमान’ (धैर्यधर), ‘मत्स्यगंधा’ (भीष्म), ‘स्वयंवर’ (शिशुपाल), ‘संशयकल्लोळ’ (फाल्गुनराव),‘भावबंधन’ (प्रभाकर व कामण्णा), ‘एकच प्याला’ (भगीरथ, शरद), ‘पंडितराज जगन्नाथ’ (कलंदर), ‘मंदारमाला’ (भैरव), ‘सुवर्णतुला’ (नारद), ‘जय जय गौरी शंकर’ (शृंगी), ‘स्वरसम्राज्ञी’ (भय्यासाहेब), ‘बावनखणी’ (मोरशास्त्री) ही डेग्वेकर यांची गाजलेली संगीत नाटके. ‘दुरितांचे तिमीर जावो’मधील त्यांनी साकारलेला ‘बापू’ही गाजला.  ‘बेबंदशाही’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘उद्याचा संसार’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘देव दिनाघरी धावला’, ‘अपराध मीच केला’, ‘साष्टांग नमस्कार’ आदी ऐतिहासिक, सामाजिक नाटकांतूनतसेच ‘गीत सौभद्र’, ‘महाश्वेता’ आदी संगीतिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या. डेग्वेकर यांना अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेच्या ‘जीवनगौरव’पुरस्कारासह गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे पुरस्कार, रंगशारदा संस्थेचा विद्याधर गोखले पुरस्कार, नाटय़ परिषद-पुणे यांचा केशवराव दाते पुरस्कार, गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार आदींनी सन्मानित करण्यात आले आहे.

नव्या पिढीकडून बसवून घेतलेली जुनी संगीत नाटके हे डेग्वेकर यांचे सगळ्यात महत्त्वाचे काम आहे. विशेष म्हणजे ही नाटके बसविण्यासाठी, नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्या त्या संगीत नाटकातील विविध पात्रे, त्यांच्या भूमिका उलगडून दाखविण्यासाठी त्यांनी कोणताही आर्थिक मोबदला/मानधन आजवर कधीही घेतले नाही. त्यांच्या या निरलस व नि:स्वार्थी सेवेविषयी त्यांना विचारले असता डेग्वेकर म्हणाले, संगीत रंगभूमीने मला मान-सन्मान, प्रतिष्ठा, यश, आर्थिक स्थैर्य असे सर्व काही दिले. संगीत रंगभूमीच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी कोणतेही आणि मराठी संगीत रंगभूमीचा वैभवशाली वारसा जपण्यासाठी मी हे काम केले. शिवरंजनी (पुणे), नादब्रह्म परिवार (चिंचवड), कलाद्वयी (पुणे), ऋतुरंग (डोंबिवली) आदी संस्थांसाठी मी जुनी संगीत नाटके नव्याने बसवून दिली.

डेग्वेकर यांनी त्या काळात नोकरी सांभाळूनच सर्व नाटके, तालमी व प्रयोग केले. चित्रपटात काम करण्याविषयी त्यांना विचारणा झाली होती. पण चित्रीकरणासाठी अनेक दिवस मुंबईबाहेर जावे लागेल आणि नोकरी करत असताना ते शक्य होणार नाही म्हणून ते चित्रपटाकडे वळलेच नाहीत. ‘माझ्या कुटुंबीयांसाठी माझी नोकरीच हीच मीठभाकर आहे हे मी कायम लक्षात ठेवले. त्यामुळे नोकरी सांभाळून जशी जमतील तशी नाटके केल्याचे ते सांगतात. ‘ कोणताही एकच रस्ता धरू नकोस. चांगली आणि अभिनयाचा कस लागेल अशी जी भूमिका मिळेल ती स्वीकार, असा सल्ला माझे गुरू मा. दत्ताराम यांनी दिला होता. तो मी आयुष्यभर पाळला. त्यामुळेच आजवरच्या नाटय़प्रवासात विविध भूमिका करू शकलो, असेही डेग्वेकर म्हणाले. नोकरी आणि नाटक याला मी वाहून घेतल्यामुळे घर-संसार आणि दोन मुलांचे सर्व काही माझी पत्नी विनया हिने कोणतीही तक्रार न करता आणि तिची स्वत:ची नोकरी सांभाळून केले. पत्नी विनया, मुलगा दिलीप, सून दिपा, नात मुक्ता तसेच मुलगी व जावई डॉ. अश्विनी आणि अजित पेंढारकर, नात सायली हा माझा परिवार आहे. आयुष्याच्या या वळणावर मी सुखी, समाधानी आणि आनंदी असल्याचेही डेग्वेकर कृतज्ञतेने सांगितले.

संगीत मराठी रंगभूमी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. महाराष्ट्राखेरीज भारतात अन्य कुठेही संगीत रंगभूमी नाही. एकेकाळी रंगभूमीचा सुवर्णकाळ असलेल्या मराठी संगीत रंगभूमीची आजची अवस्था मनाला क्लेश देणारी आहे. संगीत रंगभूमीचे जतन आणि संवर्धन हे आपल्या प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. त्यासाठी जुनी संगीत नाटके संपादित स्वरूपात आणि काळानुरूप काही बदल करून नव्या पिढीसाठी वेळोवेळी रंगभूमीवर नव्याने सादर झाली पाहिजेत. या नाटकांना प्रेक्षकांनीही प्रतिसाद दिला पाहिजे, अशी अपेक्षाही डेग्वेकर यांनी गप्पांचा समारोप करताना व्यक्त केली.