दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी आणि बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा चित्रपट ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच यूजर्सने या चित्रपटाची तुलना प्रभासच्या ‘बाहुबली’ चित्रपटाशी केली आहे. या चित्रपटात भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी झालेल्या पहिल्या युद्धाची पार्श्वभूमी दाखवण्यात येणार आहे.

‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहता या चित्रपटामध्ये चिरंजीवीने एका राजाची व्यक्तीरेखा साकारली आहे. यात युद्धकौशल्यामध्ये निपुण असलेला हा राजा वीर योद्धा असण्यासोबतच ध्यानधारणा करणाऱ्या एखाद्या योगी व्यक्तीप्रमाणेच शांत आणि संयमी आहे. चित्रपटात स्वातंत्र्यपूर्वीचा काळ दाखवण्यात आला आहे. राजा नरसिम्हा रेड्डी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अथक प्रयत्न करताना दिसत आहे. त्यासाठी राजा इंग्रजांसोबत युद्धाची घोषणा देखील करतो.

‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, किच्चा सुदीप, तमन्ना भाटिया यासारखे दिग्गज कलाकार मंडळी झळकणार आहेत. यात अमिताभ बच्चन ‘नरसिम्हा रेड्डी’च्या गुरुंची भूमिका साकरत असून त्यांचा हा कॅमियो रोल आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन या चित्रपटात झळकणार असल्याचे समजल्यापासून या चित्रपटाविषयी अनेक चर्चांना उधाण आले आहे. ट्रेलरमधील भव्य दिव्य सेट आणि सीन पाहता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. २०० कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट तेलुगु, हिंदी, तामिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.