विनोदवीर कपिल शर्मा सध्या त्याच्या कोणत्या कार्यक्रमामुळे किंवा सहकालाकारासोबत झालेल्या वादामुळे चर्चेत नाही. तर तो चर्चेत असण्यामागचे कारण आहे त्याचा आगामी चित्रपट ‘फिरंगी’. काही दिवसांपूर्वी कपिलच्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामागोमागच आता या चित्रपटातील गाणेही प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘ओय फिरंगी’ असे बोल असणारे हे गाणे अगदी कोणाच्याही लक्षात राहील असेच आहे. कोणताही भलामोठा सेट, वाद्यांचा आवाज नसला तरीही गाण्याचे बोल आणि त्याची चाल श्रवणीय वाटत आहे.

राजीव धिंग्रा दिग्दर्शित ‘फिरंगी’ या चित्रपटातील हे पहिलेच गाणे असून, त्यात कपिलचा अभिनयही पाहण्याजोगा आहे. साधाभोळा तरुण त्याला पोलिसाची नोकरी मिळणार या कल्पनेनेच कसा हुरळून जातो आणि ब्रिटीश अधिकाऱ्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारतो याचे चित्रण गाण्यातून करण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील कथानकावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आल्यामुळे ब्रिटीश अधिकारी, त्यांची चाकरी करणारे भारतीय असे एकंदर दृश्यं या गाण्यात पाहायला मिळत आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

डॉ. देवेंद्र काफिर यांनी ‘ओय फिरंगी’ची गीतरचना केली असून, त्याला जतिंदर शहा यांनी संगीत दिले आहे. प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिने हे गाणे गायल्यामुळे ते आणखीनच गाजत आहे. विनोदवीर कपिलचा रोमॅन्टिक अंदाजही या गाण्यातून पाहता येतोय.  त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचत आहे. तेव्हा आता कपिलच्या अभिनय कारकिर्दीत हा चित्रपट फार महत्त्वाचा असून, आता प्रेक्षक त्याला पसंती देणार का, हे २४ नोव्हेंबरला कळेल हेच खरे.