सध्या लॉकडाउन असल्यामुळे देशात २१ दिवसांसाठी सारं काही बंद आहे. मात्र या लॉकडाउनचा काळ संपल्यानंतर सिनेमागृहांची साखळी चालविणाऱ्या पीव्हीआर कंपनीने चित्रपटगृहांसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जनजीवन सुरळीत सुरु झालं तरीदेखील पीव्हीआर त्यांच्या चित्रपटगृहांमध्ये सोशल डिस्टंसिंग ( social distancing) पाळणार आहेत.

‘द हिंदू’नुसार, साधारणपणे चित्रपटगृहांमध्ये आसनांची रचना एकमेकांना जोडलेली असते. त्यामुळे बऱ्याच वेळा आसनांवर हात ठेवताना एकमेकांना धक्का लागतो किंवा स्पर्श होतो. अशा परिस्थिती कोणत्याही आजाराचा संसर्ग लवकर होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आता या आसनांच्या रचनेत बदल करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा विचार करण्यात आला आहे.

“चित्रपटगृहात आता सोशल डिस्टंसिंग ( social distancing) पाळण्यात येणार आहे याविषयीची माहिती प्रेक्षकांना तिकीट खरेदी करतानाच सांगण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात प्रेक्षकांना पॉपकॉर्न शेअर करणं, चित्रपट बघतांना गप्पा मारणं या साऱ्या गोष्टींना रामराम करावं लागणार आहे. आम्ही चित्रपटगृहांमधील आसनांच्या रचनेत बदल करणार आहोत. तसंच चित्रपगृहांमध्ये प्रेक्षकांसोबत बोलताना सोशल डिस्टंसिंग ( social distancing) कशी ठेवावी यांचही प्रशिक्षण आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना देत आहोत”, असं ‘पीव्हीआर’च्या गौतम दत्ता यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितलं.

पुढे ते म्हणतात, “सध्या या नवीन योजनेवर आम्ही काम करत आहोत. केवळ आसन व्यवस्थेबाबतच नाही. तर, चित्रपगृहांमध्ये प्रेक्षक सोशल डिस्टंसिंग पाळतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या काही योजनाही आखण्याचा आमचा विचार आहे. जर प्रेक्षक एका वेळी दोन सीट आरक्षित करत असतील तर त्या दोन सीट्समध्ये आम्ही एका सीटचं अंतर ठेऊ. परंतु हे काही आठवडे आणि महिन्यांपूरतंच मर्यादित आहे. त्यानंतर सारं काही पहिल्यासारखं होईल”.

दरम्यान, करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टंसिंग ( social distancing) जपणं अत्यंत गरजेचं आहे. याविषयी प्रशासनाकडून वारंवार सुचनाही देण्यात येत आहे. त्यामुळे करोना आणि तत्सम रोगांचा संसर्ग वाढू नये यासाठी पीव्हीआरने हा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे