करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने घरात राहणं पसंत केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील २१ दिवस लॉकडाउन करण्याची घोषणा केल्यामुळे शाळा, महाविद्यालये, ऑफिस सारं काही बंद आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक सध्या घरीच आहे. यात मालिका, चित्रपट,वेबसीरिज यांचंही चित्रीकरण बंद असल्यामुळे सेलिब्रिटी घरी आहेत. विशेष म्हणजे घरी राहून हे सेलिब्रिटी त्यांच्या वेळेचा सदुपयोग करत आहेत. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या ते घरी काय करतायेत हेदेखील सांगत आहेतं. परंतु सेलिब्रिटी सतत त्यांच्या अपडेट्सचे व्हिडीओ शेअर करत असल्यामुळे नृत्यदिग्दर्शिका फराह खान वैतागली असून हे व्हिडीओ शेअर करणं बंद करा असं तिने सांगितलं आहे.
कतरिना कैफ, कार्तिक आर्यन आणि करणसिंह ग्रोवर या सारख्या दिग्ग्ज कलाकारांनी त्यांच्या वर्कआऊटचे किंवा घरात सध्या जे काही काम करतायेत, याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र हे व्हिडीओ पाहून फराह चांगलीच वैतागली असून तिने या कालाकारांना हे प्रकार थांबविण्याची विनंती केली आहे.
‘हाय, मी फराह खान. प्रत्येक जण घरी बसून वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत आहे. त्यामुळे म्हटलं चला आपण सुद्धा एखादा व्हिडीओ काढूयात. त्यामुळे मी हा व्हिडीओ करत आहे. जनहितार्थसाठी करत असलेल्या या व्हिडीओमध्ये मी एक गोष्ट सांगू इच्छिते, जे सेलिब्रिटी आणि स्टार्स घरी राहून त्यांच्या वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करत आहेत. त्यांनी हे व्हिडीओ करणं बंद करा आणि विनाकारण आम्हाला टॅग करणंदेखील टाळा’,असं फराह म्हणाली.
पुढे ती म्हणते, ‘या जागतिक संकटामध्ये तुम्हाला तुमच्या फिटनेसची काळजी आहे ही चांगली गोष्ट आहे. मात्र यापेक्षाही फार मोठी चिंता करण्याची घटना सध्या घडतीये. त्यामुळे आमच्यावर उपकार करा आणि हे व्हिडीओ टाळा आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर मी तुम्हाला अनफ्रेंड करते’.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे शाळा, कॉलेज, ऑफिस सारं काही बंद आहे. सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर आतापर्यंत ६०० पेक्षा अधिक जणांना करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या देशात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.