बॉलिवूड गायिका कनिका कपूरला काही दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतर चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या कनिकावर लखनऊमधील संजय गांधी ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये उपचार सुरु आहेत. मात्र उपचारादरम्यान कनिका डॉक्टरांना सहकार्य करण्याऐवजी त्यांनाच वेगवेगळ्या फर्माइशी करत असल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर तिला रुग्णालयामध्ये अन्य करोनाग्रस्तांपेक्षा जास्त सुविधा पुरविण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, “कनिका उपचारादरम्यान योग्य प्रतिसाद देत नाही. तसंच तिला अन्य रुग्णापेक्षा वेगळ्या सुविधा पुरविण्यात आल्या आहे. मात्र तरीदेखील तिचे नखरे काही केल्या थांबत नाहीयेत. तिला ग्लुटेन फ्री जेवण देण्यात येत आहे. तसंच तिला विशेष सुविधाही पुरवल्या जात आहेत”, असं एसजीपीजीआयचे डायरेक्टर जनरल आरके धीमान यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, “कनिकाला आयसोलेटेड खोली असून त्यात बाथरुम,बेड आणि टीव्हीची सुविधा पुरविण्यात आली आहे. तसंच कोविड१९ युनिटनुसार तिच्या रुमला एअर हँडलिंग युनिटही आहे. हे युनिट इतर करोना व्हायरस युनिटहून वेगळं आहे. हे सारं  तिला पुरविण्यात येत असूनदेखील ती येथे रुग्ण म्हणून न वावरता एक सेलिब्रिटी म्हणून वावरत आहे”.

दरम्यान, संपूर्ण जगात करोना विषाणूची भीती असल्यामुळे सर्वजण स्वत:ला करोना होणार नाही ना यासाठी काळजी घेत आहेत. बॉलिवूड कलाकारांनी तर घराबाहेर पडणे टाळले आहे. अशातच ‘बेबी डॉल’ या लोकप्रिय गाण्याची गायिका कनिका कपूरला करोनाचा संसर्ग झाला आहे.