मुलांसाठी शक्तिवर्धक कॉम्प्लान पावडरची जाहिरात करताना प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी वठवलेली भुताची व्यक्तिरेखा त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण या जाहिरातीमुळे ‘जादूटोणा विरोधी कायद्या’ चा भंग झाल्याचा आरोप करून पुण्याच्या न्यायालयात फौजदारी दावा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीतील आरोपांची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असा आदेश प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी अनिरुद्ध पाठक यांनी पोलिसांना दिला आहे.
अमिताभ यांच्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या करवीर तालुक्यातील इमेज इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि., हेन्स इंडिया कंपनीचे जाहिरात सरव्यवस्थापक अभिषेक प्रसाद (रा. मुंबई) आणि व्यवस्थापकीय संचालक सीमा मोदी (रा. मुंबई) यांच्या विरोधात न्यायालयात खासगी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या चौघांनी ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधी कायदा २०१३’ चा भंग केल्याचे त्यात म्हटले आहे. पुण्याच्या कसबा पेठेतील एका व्यक्तीने ही तक्रार केली आहे.
न्यायालयात सादर केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कॉम्प्लान पावडरची ४५ सेकंदाची जाहिरात आहे. त्यात बच्चन यांनी भुताचे पात्र वठवले आहे. कॉम्प्लान पावडर खाल्ल्यास भूत मागे येते व कामात मदत करते, असे त्यात दाखवले आहे. ही जाहिरात प्रदर्शित करताना ‘ती काल्पनिक आहे’ असे दाखविणे अत्यंत आवश्यक होते. परंतु, तसे केलेले नाही. या जाहिरातीमुळे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधी कायद्याच्या पहिल्या व सहाव्या नियमाची पायमल्ली झाली आहे. बच्चन हे प्रसिद्ध अभिनेते असल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनुकरण करून इतर लोकही या गोष्टीची पुनरावृत्ती करू शकतात. या जाहिरातीमुळे भूत आमच्या पाठीशी आहे, अशी भावना लहान मुलांच्या मनावर बिंबवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंपनीने उत्पादन विकण्यासाठी खोटारडेपणा केला आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीवर न्यायालयाने तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश फरासखाना ठाण्याच्या पोलिसांना दिले आहेत.