मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. एकीकडे तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे तर दुसरीकडे मुसळधार पावसाचा फटका टीव्ही इंडस्ट्रीलाही बसला आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीतील अर्थात गोरेगावमधील फिल्मसिटीतील बहुतेक मालिकांच्या सेटवर पाणी साचलं आहे. पावसातही काही मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे तर काहींना सुट्टी देण्यात आली आहे.
ठाण्यात ज्या मालिकांचे चित्रीकरण सुरू होते, त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये ह.म. बने, तु.म.बने, घाडगे अँड सून या मालिकांचा समावेश आहे. यासोबतच माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेच्या कलाकारांना पावसामुळे सुट्टी देण्यात आली आहे. तर झी युवा वाहिनीच्या अनेक मालिकांना पावसाचा फटका बसला आहे. मीरा रोड इथं सुरू असलेल्या ‘तू अशी जवळी रहा’, ठाण्यातील घोडबंदर रोडवर असणारं ‘फुलपाखरू’, वर्तुळ, एक घर मंतरलेलं या मालिकेच्या लोकेशन्सना पावसाचा फटका बसला आहे.
ह.म.बने.. मालिकेतील अभिनेता अजिंक्य जोशीच्या घरात पाणी शिरल्यामुळे सोमवार व मंगळवार दोन्ही दिवस शूटला सुट्टी दिली गेली. जवळपास सर्वच मालिकांचे पाच एपिसोड आगाऊ शूट करून तयार ठेवले जातात. मात्र पावसामुळे या मालिकांचा चांगलाचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे आता कलाकारांना त्यांच्या सुट्टीच्या दिवशीही काम करावं लागणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 2, 2019 11:48 am