स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच ज्योतिबाचं महात्म्य सांगणारी मालिका सुरु होत आहे. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ म्हणजे महाराष्ट्राचं लोकदैवत. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत हजारोंच्या संख्येने भक्त आपल्या लाडक्या दैवताला साकडं घालतात. करोनाच्या या संकटकाळात गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ भक्तांना ज्योतिबाच्या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता आलेलं नाही. आपल्या लाडक्या दैवताच्या भेटीची भक्तांची ही आस लवकरच पूर्ण होणार आहे. स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना घरबसल्या ज्योतिबाचं दर्शन होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनी आणि कोठारे व्हिजन्सने हे नवं आव्हान स्वीकारलं असून ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका २३ ऑक्टोबरपासून सायंकाळी ६.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विशेष म्हणजे ज्योतिबा देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीतच मालिकेचं संपूर्ण शूटिंग होणार आहे. कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा भव्यदिव्य सेट आकाराला येत असून लवकरच मालिकेच्या शूटिंगचा श्रीगणेशा होणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि कामगारांना नवी संधी मिळाली आहे.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Vijay Salvi in ​​Kalyan
कल्याणमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय साळवी यांच्या शिवशाही-ठोकशाही चित्ररथाला पोलिसांची हरकत

या मालिकेच्या भव्यतेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “स्टार प्रवाह प्रस्तुत दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका अभ्यासपूर्वक बनवली जात आहे. आपल्या रसिकांपर्यंत प्रामाणिक मनोरंजनाद्वारे त्यांच्या आराध्य दैवताचं दर्शन आणि त्या दैवताच्या आयुष्यातील माहित असलेले आणि काही नव्याने कळतील असे पैलू या मालिकेद्वारे मांडण्यात येणार आहेत. भाविक आवर्जून ही मालिका बघतील, आणि त्यांना आपल्या लाडक्या ज्योतिबाची मालिका आणि त्यांचा महिमा घरबसल्या पाहता येईल.”

पाहा फोटो >> दख्खनच्या राजाचं ‘विशाल’ रुप

मालिकेच्या भव्यतेविषयी सांगताना निर्माते महेश कोठारे म्हणाले, “या मालिकेसाठी कोल्हापुरात भव्यदिव्य सेट उभा करण्यात आलाय. जवळपास दीड महिन्यापासून सेटचं काम सुरु आहे. कोल्हापुरात असा भव्य सेट उभारणं हे देखील आव्हान होतं. कलादिग्दर्शक संतोष फुटाणे आणि संपूर्ण टीम सेट उभारण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. यामध्ये ज्योतिबाचा महाल, महालक्ष्मीचा महाल, गाव, आश्रम, क्रोमा फ्लोअर यांचा समावेश आहे. यासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी मुंबईहून ट्रान्सपोर्ट कराव्या लागल्या. यासोबत निलीमा कोठारे आणि नीता खांडके यांच्या एन क्रिएशन्सचं सुद्धा कौतुक ज्यांनी खूप रिसर्च करुन मालिकेसाठी पोशाख आणि दागिने तयार केले आहेत. हे करताना अनेक पोथ्यांचे दाखले घेण्यात आले आहेत. मालिकेला या सगळ्या गोष्टी वेगळ्या उंचीवर नेतील याची खात्री आहे.”

डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे हे या मालिकेचे तज्ज्ञ सल्लागार आहेत. संशोधक आणि लेखक म्हणून महाराष्ट्रात ते परिचित आहेत. ‘महाराष्ट्रातील लोकदैवते’ हा त्यांच्या खास अभ्यासाचा विषय आहे. ज्योतिबा देवावरचे त्यांचे संशोधन पुस्तकरूपाने लवकरच प्रसिद्ध होत आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हे देखील या मालिकेसाठी मार्गदर्शन करत आहेत. मालिकेच्या लेखनाची जबाबदारी स्वामी बाळ यांच्याकडे असून अविनाश वाघमारे दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.