दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा हिंदी सिनेसृष्टीतील एक माईलस्टोन सिनेमा आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. मराठा मंदिर या चित्रपटगृहात या सिनेमाने २४ वर्षांपेक्षा जास्त काळ पूर्ण केला. राज (शाहरुख खान) आणि सिमरन (काजोल) यांची लव्हस्टोरी गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना भुरळ घालते आहे. मात्र लॉकडाउन आणि करोना काळात सिनेमागृहं बंद असल्याने हा सिनेमाही मराठा मंदिर चित्रपटगृहात दाखवला जात नव्हता. आता सिनेमागृहं उघडण्यास ठाकरे सरकारने संमती दिली आहे त्यामुळे हा सिनेमा पुन्हा एकदा मराठा मंदिर सिनेमागृहात झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.

आणखी वाचा- … म्हणून अजय देवगणने आजपर्यंत नाही पाहिला काजोलचा DDLJ

मुंबईसह महाराष्ट्रात कंटेन्मेंट झोन वगळून सिनेमागृहं, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहं उघडण्यास संमती देण्यात आली आहे. त्यामुळे आता मराठा मंदिर या सिनेमागृहात झळकण्यासाठी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सिनेमा सज्ज झाला आहे. या सिनेमाला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. २० ऑक्टोबर १९९५ ला हा सिनेमा रिलिज झाला होता. शाहरुख खान, काजोल, मंदिरा बेदी, फरिदा जलाल, अमरिश पुरी, परमीत सेठी यांच्यासारखी तगडी स्टार कास्ट, यशराजचं बॅनर आणि तरुणाईला भुरळ घालणारी लव्ह स्टोरी अशी या सिनेमाची परफेक्ट भट्टी जमून आली. हा सिनेमा आजही तरुण वर्गाला भुरळ घालतो आहे. राज आणि सिमरन यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या आजही पसंतीला पडते आहे.

आणखी वाचा- Video : ‘डीडीएलजे’मधील पलट सीन आठवतोय? आहे ‘या’ हॉलिवूडपटातील कॉपी

मराठा मंदिर सिनेमागृहाचे मालक मनोज देसाई यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, “मागील २५ वर्षात लॉकडाउनचा काळ ही पहिलीच वेळ होती की दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा सिनेमा झळकला नाही. आम्ही या सिनेमाचा रौप्य महोत्सव साजरा करु शकलो नाही म्हणूनही काहीसे नाराज आहोत. आता आमची यशराज सिनेमा प्रॉडक्शन हाऊससोबत चर्चा सुरु आहे. मराठा मंदिरमध्ये सिनेमा झळकल्यानंतर रौप्य महोत्सवी वर्षाचं सेलिब्रेशन कसं सुरु आहे त्यासंबंधी ही चर्चा सुरु आहे. आम्हाला आमचं थिएटर ८ महिने बंद ठेवावं लागलं याचंही वाईट वाटतं आहे” असंही देसाईंनी म्हटलं आहे.