बॉलिवूडचे ‘बाजीराव-मस्तानी’ अर्थात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्याकडे बॉलिवूडचे ट्रेंडिंग कपल म्हणून पाहिलं जातं. दोन वर्षांपूर्वी इटलीमध्ये लग्नगाठ बांधलेल्या या दोघांची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळेच या दोघांविषयीचे सारे अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यातच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हे दोघेदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतात. तसंच इन्स्टा, फेसबुक या सारख्या माध्यमांमध्ये त्यांच्या नावाचे अनेक फॅनपेजही आहेत. याच फॅनपेजवर सध्या दीपिका-रणवीरचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दीपिका-रणवीर चक्क ८० वर्षांचे वयस्क व्यक्तीसारखे दिसत आहेत.

दीप-वीरचा हा फोटो एका चाहत्याने एज ओल्ड फिल्टरच्या माध्यमातून तयार केला आहे. या फोटोमध्ये दीप-वीर वयाच्या ८० व्या वर्षी कसे दिसतील हे दाखविण्यात आलं आहे. यात रणवीरची दाढी आणि केस पांढरे झाले असून चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत.तर दीपिकादेखील वयस्कर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरही मोठ्या प्रमाणावर सुरकुत्या असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या वयोवृद्ध अवस्थेमध्येही ही जोडी तितकीच गॉर्जियस दिसून येत आहे.

 सध्या कलाविश्वामध्ये हा नवा ट्रेंड सुरु झाला आहे. या नव्या ट्रेंडअंतर्गत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांचे वयोवृद्ध अवस्थेतील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्री सोनम कपूरचाही समावेश आहे. सोनमेदेखील सोशल मीडियावर तिचा वृद्धावस्थेतील एक फोटो शेअर केला होता.

दरम्यान, दीपिका लवकरच ‘छपाक’ चित्रपटात झळकणार आहे. तर रणवीर ’83’मध्ये दिसून येणार आहे. ‘छपाक’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार करत असून दीपिका यात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिची भूमिका वठविणार आहे. तर ’83’ या चित्रपटामध्ये रणवीर सिंग तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे.