‘दिया और बाती’ या लोकप्रिय मालिकेत संध्या बिंदणीची भूमिका साकारणाऱ्या दीपिका सिंह हिच्या आईला करोनाची लागण झाली आहे. दीपिकाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. सोबतच तिने दिल्ली सरकार आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. दीपिकाच्या आईची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही त्यांना रिपोर्ट न दिल्यामुळे त्यांच्या उपचार प्रक्रियेत अडथळा येत असल्याचं दीपिकाने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

दीपिकाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या कुटुंबियांची आणि आईच्या परिस्थितीचं कथन केलं आहे. “काही दिवसांपूर्वी माझ्या आईची लेडी हार्डिंग हॉस्पिटल येथे करोना चाचणी करण्यात आली. यावेळी तिचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र अद्याप हे रिपोर्ट आमच्या हातात मिळालेले नाहीत. याप्रकरणी रुग्णालयात संपर्क केला असता त्यांनी केवळ रिपोर्टसचे फोटो काढण्यास सांगितले. मात्र रिपोर्ट हातात दिले नाही. त्यामुळे रिपोर्ट अभावी माझ्या आईवर कोणत्याही रुग्णालयात उपचार करण्यात येत नाहीयेत. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सरकार कृपया माझी मदत करा”, असं दीपिकाने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

पुढे ती म्हणते, “दिल्लीत माझं मोठं कुटुंब आहे. जवळपास ४५ लोकं या कुटुंबात राहतात. त्यामुळे आईला झालेल्या करोनाची लागण कुटुंबीयांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृपया माझी मदत करा”. दरम्यान, दिल्लीतील कोणत्याच रुग्णालयात जागा नसल्यामुळे तिच्या आईला कोणतंही रुग्णालय अॅडमीट करुन घेण्यास तयार नाही. त्यामुळे सध्या घरीच तिच्या आईवर उपचार सुरु असल्याचं सांगत तिने चिंता व्यक्त केली आहे.