अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ‘इंडियन एअर फोर्स’ने या चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेतला होता. परिणामी या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारने केली होती. केंद्राची ही मागणी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ या चित्रपटावर बंदी घालावी यासाठी केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

कारगिल युद्धात गुंजन सक्सेना यांनी फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवलं होतं. लढाऊ विमान उडवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या होत्या. दरम्यान युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता. त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं होतं. त्यांच्या या साहसाची कथा ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली. मात्र या चित्रपटातील काही दृष्यांवर भारतीय हवाई दलाने आक्षेप नोंदवला. भारतीय हवाईदलाने धर्मा प्रोडक्शन, नेटफ्लिक्स आणि सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून या चित्रपटातील काही दृष्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ चित्रपटामध्ये भारतीय हवाई दलाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आलं होतं.

“भारतीय हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी अभ्रिप्राय देण्यासाठी पाठवण्यात आलेल्या चित्रपट पहिल्यानंतर या चित्रपटातील काही दृष्य, संवाद आणि ट्रेलरमधील काही भाग भारतीय हवाई दलाची नकारात्मक प्रतिमा तयार करत असल्याचे निर्दर्शनास आलं आहे. चित्रटातील मुख्य पात्राचे म्हणजेच फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांचे महत्व वाढवून दाखवण्यासाठी धर्मा प्रोडक्शनने काही घटना चुकीच्या पद्धतीने दाखवल्या आहेत. भारतीय हवाई दलामध्ये महिलांना देण्यात येणाऱ्या वागणूकीबद्दल चुकीचा संदेश यामध्यमातून दिला जात आहे,” असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं होतं.