उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील नंदादेवी हिमकड्याचा काही भाग कोसळल्याने रविवारी धौलीगंगा नदीला मोठा पूर आला. या प्रलयामध्ये सोमवार सकाळपर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर १५० जण अजूनही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेनंतर कलाविश्वातील सेलिब्रिटी व्यक्त झाले असून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेता सोनू सूद, दिया मिर्झा, श्रद्धा कपूर, अजय देवगण असे अनेक सेलिब्रिटी या दुर्घटनेवर व्यक्त झाले आहेत. “हे खरंच अत्यंत भयान आणि भीतीदायक आहे. या कठीण प्रसंगात उत्तराखंडमधील लोकांच्या सोबत माझ्या प्रार्थना आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचेल याची आशा करुयात”, असं अभिनेता अजय देवगण म्हणाला.

हाहाकार आणि जीव वाचवण्याची धडपड; पहा जलप्रलयानंतरची झोप उडवणारी दृश्य

“उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळ्याचं वृत्त ऐकल्यापासून मन विचलित झालं आहे. तेथील सगळे लोक सुखरुप असावेत हीच प्रार्थना”, असं श्रद्धा कपूर म्हणाली. तर, “उत्तराखंडमधील चमोली आणि अन्य जिल्ह्यात हिमकडा कोसळ्यानंतर तेथील नागरिक सुरक्षित असतील, कोणाच्याही जीवावर काही बेतलं नसेल अशी आशा आहे”, असं प्रसून जोशी म्हणाले.

“हिमालयांमधील नद्यांवर अनेक धरणं बांधण्यात आल्यामुळे खरं तर हे होत आहे. चमोलीच्या लोकांसाठी मनापासून प्रार्थना. कृपया या संकटकाळात 1070 आणि 9557444486 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करा”, असं ट्विट दिया मिर्झाने केलं आहे.

रविवारी हिमकडा कोसळल्याने आलेल्या प्रलयात अलकनंदा नदीवरील जलविद्युत केंद्रे आणि ऋषीगंगा नदीवरील लघू जलविद्युत प्रकल्प वाहून गेल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. नंदादेवी हिमकड्याचा काही भाग सकाळी कोसळल्यानंतर धौलीगंगा, ऋषीगंगा आणि अलकनंदा या गंगेच्या उपनद्यांना रविवारी दुपारी महापूर आला. त्यामुळे त्यांच्या काठांवरील डोंगराळ भागांत हाहाकार उडाला. या प्रलयामुळे ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन’चा (एनटीपीसी) धौलीगंगा नदीवरील तपोवन-विष्णूगड जलविद्युत प्रकल्प आणि ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्पाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. ऋषीगंगा नदीवरील एक लघू जलविद्युत प्रकल्पही वाहून गेल्याची माहिती इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या प्रवक्त्याने दिली.