News Flash

इतना सन्नाटा क्यूँ है भाई?

vएकीकडे शास्त्रज्ञांचा हा अकटोविकटीचा संघर्ष सुरू असतानाच दुसरीकडे मानवी क्षुद्रताही तितक्याच जोमाने वृद्धिंगत होताना दिसते आहे.

|| रवींद्र पाथरे

‘इतना सन्नाटा क्यूँ हैं भाई?’ हा ‘शोले’मधला ए. के. हंगल यांचा कापऱ्या आवाजातला डायलॉग त्याकाळी प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवीत असे. आज करोनाकाळाने तशीच भयग्रस्त परिस्थिती सबंध जगावर ओढवली आहे. करोनाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या लाटांनी अनेकांच्या आयुष्यात होत्याचं नव्हतं केलं आहे. १८९७ च्या प्लेगच्या सर्वदूर साथीमध्येही जे झालं नाही, ते या भीषण करोनाने घडवून आणलं आहे. सबंध जग ठप्प करण्याचं ‘अघटित’ या अदृश्य विषाणूने करून दाखवलं आहे. मानवी संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या उत्क्रांतीच्या आणि संस्कृतीकरणाच्या प्रदीर्घ प्रवासात निर्माण झालेली आदर्श मूल्यं, सामाजिक संकेत, नैतिकता वगैरे सगळ्याचा पार चोळामोळा करून माणसाने पांघरलेली सभ्यता, सुसंस्कृतपणाची झूल उघडी पाडण्यात करोना यशस्वी झाला आहे. मानवी संस्कृतीवर आजवर अनेक घाले आले. भीषण दुष्काळ, भूकंप, ज्वालामुखींचे उद्रेक, प्रचंड वादळं, त्सुनामी, जलप्रलय, संसर्गरोगांच्या साथी, दुर्धर आजार, युद्धं, आर्थिक संकटं… असे बरेच. परंतु आपल्या उपजत विजिगिषु वृत्तीनं माणूस या प्रत्येक संकटांशी दोन हात करत आलेला आहे. आणि त्यातून तरून ‘पुनश्च हरी ओम्’ म्हणत नष्टप्राय झालेल्या जीवनातून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे नव्याने उभारी घेत प्रगतीची नवनवी शिखरं पादाक्रांत करता झाला आहे. एवढंच नाही तर ग्रह-ताऱ्यांवर स्वारी करून अंतराळातदेखील  मानवी वस्ती करण्याची आकांक्षा तो बाळगून आहे. असं असताना एका करोनासाथीने त्याला पार लुळेपांगळे करावं?

शक्यच नाही!

करोनाला नेस्तनाबूत करण्यासाठी तो गेलं वर्ष- दीड वर्षं आकाशपाताळ एक करतो आहे. त्याच्या फलनिष्पत्तीतून लवकरच करोनाला माणसाने वेसन घातलेली दिसेल अशी अपेक्षा… नव्हे, खात्रीही आहेच!

एकीकडे शास्त्रज्ञांचा हा अकटोविकटीचा संघर्ष सुरू असतानाच दुसरीकडे मानवी क्षुद्रताही तितक्याच जोमाने वृद्धिंगत होताना दिसते आहे. या करोनाकाळाने माणसाला काही धडा शिकवला की नाही, याबद्दल शंका यावी असं त्याचं वर्तन या जीवघेण्या संकटातही दिसून येत आहे. या साऱ्याचे पडसाद साहित्य, कला, नाटक, सिनेमा यांतून उमटतील अशी रास्त अपेक्षा असताना अद्यापि त्या आघाडीवर मात्र शांतताच  अनुभवास येते आहे. करोनाने अंतर्बाह््य ढवळून निघालेल्या मानवी जगण्याने सर्जनशील कलावंतांना काहीच का आतून हलवलं नसेल? मग त्याची ‘कलात्मक अभिव्यक्ती’ अजूनही का होऊ नये? की कलावंत हीसुद्धा माणसंच असल्याने त्यांनाही करोनाने पार हतबुद्ध, असहाय, मूढ केलंय? करोनाकाळात लिहिलं गेलेलं काही साहित्य अलीकडेच प्रकाशित झालेलं असलं तरी त्यात या काळाचे दाहक, भीषण अनुभव उतरलेले नाहीत. मराठी रंगभूमी कायम काळाबरोबर राहण्यासाठी ख्यातीप्राप्त असताना करोनाकाळाचे पडसाद एव्हाना संहितारूपात तरी दिसायला हवे होते. त्याउलट, ‘ते’ दिवस विसरण्याचाच प्रयास बहुतेक करताना दिसताहेत. ‘नको ती दु:खद आठवण!’ ही सहज मानवी प्रवृत्ती असली, तरीही संवेदनशील कलावंत हा यास अपवाद असतो… असायला हवा.

म्हणूनच मनात येणारा हा प्रश्न…

‘इतना सन्नाटा क्यूँ हैं भाई?’

आणि दुसरीकडे… भोवताली ज्या ‘अ-मानुष’ अशा घटना-घडामोडी घडताहेत, त्या पाहता जॉर्ज ऑर्वेलची प्रकर्षानं आठवण होतेय. ‘सत्ताधाऱ्यांना सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि लोकांना फसवण्यासाठी युद्धं हवी असतात!’ असं ऑर्वेलनं पाऊणशे वर्षांपूर्वीच लिहून ठेवलंय. आपण हा अनुभव गेल्या निवडणुकीच्या वेळी घेतलेला आहेच. लोकांना सांगण्यासारखं आणि दाखवण्याजोगं काही कर्तब हातून न घडल्याने याखेरीज दुसरा मार्गही नसतो अशांकडे! तत्कालीन साम्राज्यवादी, ‘राष्ट्रवादा’चा बागुलबुवा उभा करून जगाला महायुद्धाच्या खाईत लोटणारा वंशवर्चस्ववादी हिटलर, तसंच साम्यवादाचा बुरखा पांघरलेला एकाधिकारशाहीवादी स्टॅलिन यांचे खरे चेहरे लोकांसमोर आणण्यासाठी ऑर्वेलने ‘अ‍ॅनिमल फार्म’ आणि ‘१९८४’ या कादंबऱ्या लिहिल्या. त्यातून तत्कालीन राजकीय, सामाजिक जीवनावर त्याने केलेलं प्रखर भाष्य आजच्या जगालाही तितकंच चपखलपणे लागू पडताना दिसतं. ज्या- ज्या वेळी सत्याचा गळा घोटला जातो, अभिव्यक्ती-आहार-विहार- उच्चार-संचार स्वातंत्र्याचा संकोच केला जातो, स्वतंत्र विचारांचे नागरिक आणि विरोधक यांच्यावर समाजमाध्यमांतील पाळीव ट्रोलभैरव, सीआयए, केजीबी, मोसाद, ईडी, सीबीआय यांसारख्या सरकारी यंत्रणांमार्फत ‘लक्ष’ ठेवलं जातं, त्यांच्याद्वारे त्यांचं दमन केलं जातं, प्रसंगी ‘देशद्रोही’ ठरवून गजाआड डांबलं जातं, त्यांची झुंडीनं हत्या केली जाते, गोबेल्स तंत्राने सत्याचा अपलाप करून लोकांसमोर सत्य येऊच नये यासाठी सतत नाना खटपटी लटपटी केल्या जातात, युद्धखोरीस उधाण येतं, कडव्या राष्ट्रवादाची अफू चारून माणसांचा मेंदू जायबंदी केला जातो आणि त्यांना षंढ बनवलं जातं; त्या- त्या वेळी जॉर्ज ऑर्वेलची संवेदनशील, विवेकी व्यक्तीला हमखास आठवण येतेच. आजच्या घडीला तर तो प्रकर्षानं आठवावा अशीच भोवतीची परिस्थिती आहे.

‘न-नैतिकता’ हा आज जगाचा मंत्र झाला आहे. महात्मा गांधी, लिओ टॉलस्टॉय, मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला या महापुरुषांनी आग्रहाने अंगीकारलेली नैतिक मूल्यं ही आज कमकुवतपणा मानली जाऊ लागली आहेत. ऐंशी-नव्वदच्या दशकांत अन्याय-अत्याचार यांच्याविरोधात आवाज उठवणारे, समाजातील जागले म्हणून ‘भूमिका’ घेणारे विजय तेंडुलकर, गिरीश कार्नाड, यू. आर. अनंतमूर्ती, नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी यांच्यासारखे लेखक-कार्यकर्ते काळाच्या पडद्याआड गेल्याने आज अराजकसदृश्य परिस्थितीत दबलेल्या, पीडित, रंजल्या-गांजलेल्यांचा आवाजच गेला आहे. ज्यांच्यापाशी अशी काहीएक नैतिक ताकद आहे असं वाटावं अशा व्यक्ती आज एकतर सत्ताधाऱ्यांच्या भीतीने मौनात गेल्या आहेत, किंवा मग स्वार्थापायी त्यांची तळी उचलताना तरी दिसत आहेत. त्यामुळे ‘सुमार’ सर्जनशीलांना हाताशी धरून सत्ताधीश अशा सुमारांचीच सद्दी कशी वाढेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसते आहे. डॉ. गणेशदेवी यांच्यासारख्या मोजक्याच व्यक्ती व्यवस्थेच्या ठेकेदारांच्या हडेलहप्पी वर्तनाविरोधात आवाज उठवताहेत. पण त्यांनाही पाळलेल्या ट्रोलभैरवांद्वारे हास्यास्पद ठरवण्यासाठी जंग जंग पछाडले जात आहे. किंवा मग अशा स्वतंत्र विचारांच्या व्यक्तींना दहशत, दडपशाहीने गप्प बसवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत.

जगभरात अनेक देशांत आज उजव्या, अति- उजव्या, ‘राष्ट्रवादी’ (‘राष्ट्रप्रेमा’शी याचा काडीमात्र संबंध नाही!) विचारधारेच्या राजकारण्यांचे लोकशाहीची शिडी वापरून सत्तास्थानी येणे आणि नंतर त्याच लोकशाहीच्या गळ्याला नख लावून तिची राजरोस हत्या करण्याच्या घटना दररोजही अनुभवास येत आहेत. अशा सत्ताधीशांची हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल आणि त्यांच्या कथित राष्ट्रवादाच्या गोबेल्स प्रचारतंत्राला अंधतेने बळी पडणारी जनता हे भयावह चित्र अत्र तत्र सर्वत्र दिसू लागले आहे. ते संवेदनशील, विवेकी व्यक्तींना नक्कीच चिंताग्रस्त करणारे आहे. भारतही यास अपवाद नाही. रशिया आणि चीनमध्ये हिटलरी हुकूमशाहीच आहे. तरीही तेथली जनता मुकाटपणे सत्ताधीशांना शरण जाताना दिसते, हे खचितच भयावह आहे. अमेरिकेसारख्या बड्या लोकशाही राष्ट्रातदेखील डोनाल्ड ट्रम्प नामे उटपटांग नेता लोकशाहीतून निवडून येतो आणि जनतेला चक्क वेठीस धरतो, हे म्हणजे जॉर्ज ऑर्वेलच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ आणि ‘१९८४’ या कादंबऱ्या आज वस्तुस्थितीत उतरू पाहताहेत याचेच निदर्शक आहे.

हे सारं नमुद करण्याचं कारण की, आज करोनाने सबंध जगाला विळख्यात घेतलेलं असतानादेखील देशोदेशीच्या राजकारण्यांच्या विकृत लीला कशा सुरू आहेत, हे दाखवणं. आपल्याकडेसुद्धा करोनाच्या कहरात राज्यांच्या निवडणुका करोनाचे निर्बंध न पाळता सुरू आहेत. ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान…’ ही उक्ती सार्थ करणारी मन की बात आता लोकांनी मनावर घेण्याचंच सोडून दिलं आहे. करोना लशीवरून हीन राजकारण करून लोकांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. करोनासाथीतही ‘राजकारण’च करणाऱ्या राजकारण्यांचा लोकांना आता उबग येत आहे. माध्यमांनीही ताळ सोडला आहे. ‘ते’ आणि ‘आपण’ ही दुफळी माध्यमांतूनही झिरपली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनासुद्धा समाजविरोधी वर्तनाबद्दल जाब विचारायचा सोडून ते सांगतील ते निमुटपणे ऐकून घेऊन तेच प्रसिद्ध करण्याचे ‘व्रत’ माध्यमांनी अंगीकारले आहे. त्यामुळे जनतेने उरलासुरला ‘आवाज’ही गमावला आहे. ‘सत्यकथे’चे राम पटवर्धन यांनी एकेकाळी म्हटल्याप्रमाणे, सध्या सर्वत्र कानठळ्या बसवणारी शांतता पसरली आहे!

या सगळ्या पार्श्वभूमीवर प्राप्त देश-काल-परिस्थितीचे पडसाद साहित्यातून, सिनेमातून, रंगभूमीवर, विविध कलांतून उमटतील अशी जी अपेक्षा होती, तीही (सध्या तरी!) फोल ठरली आहे. म्हणूनच प्रश्न पडतो…

‘इतना सन्नाटा क्यूँ हैं भाई?’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 2:49 am

Web Title: dialogue sholay movie corona virus wave cultural akp 94
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘जास्तीत जास्त चित्रपट प्रदर्शित करणे गरजेचे’
2 बेताल बहू..
3 ‘थलायवी’ची गर्जना फु काचीच..
Just Now!
X