बॉलिवूडमधल्या मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून काही अभिनेत्यांची नावं विचारली तर ठराविक नावं लगेचच समोर येतात. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. चॉकलेट बॉय रणबीर आणि त्याची प्रेमप्रकरणं सर्वांनाच ठाऊक आहेत. ब्रेकअप, पॅचअप, प्रेम आणि क्रश या सर्वांना सामोरं गेल्यानंतर रणबीरने आता आयुष्याच्या एका नव्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रणबीरचा अभिनय क्षेत्रात जम बसला असून आता तो लवकरच विवाहबद्ध होणार असल्याचं म्हटलं जातंय.

कतरिना कैफ, दीपिका पदुकोण यांच्यासोबतच्या लाँग टर्म रिलेशनशिपमधून बाहेर पडल्यानंतर रणबीरचं नाव बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. पण, आता मात्र लग्नाच्या बाबतीत तो गंभीर झाला असल्याचं म्हटलं जातंय. मुख्य म्हणजे रणबीरच्या आईने त्याच्यासाठी लंडनची एक मुलगी पसंत केल्याचीही चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वीच रणबीर त्याच्या आईसोबत म्हणजेच अभिनेत्री नीतू कपूरसोबत लंडनला गेला होता. संजय दत्तच्या जीवनपटाच्या चित्रीकरणातून वेळ काढत तो काही दिवसांच्या सुट्टीसाठी लंडनला रवाना झाला होता. पण, त्याची लंडनवारी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली. ‘डीएनए’च्या वृत्तानुसार, रणबीरच्या आईने त्याच्यासाठी पसंत केलेल्या मुलीला भेटायला तो लंडनला गेला होता. ती मुलगी लंडनमधील एका प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील असल्याचं कळत आहे. मुख्य म्हणजे रणबीरच्या आईलाही ती मुलगी पसंत असून रणबीरही आता लग्न करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं जात आहे.

लंडनची ती मुलगी नेमकी आहे तरी कोण, तिचं नाव काय, याबद्दल काहीच माहिती समोर आली नाहीये. रणबीरसाठी इंडस्ट्रीच्या बाहेरील मुलगीच योग्य असल्याचं नीतू कपूर यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. त्यातही बी टाऊनचा हा लाडका अभिनेता ‘मम्माज बॉय’ असल्यामुळे आईच्या शब्दापुढे तो नाही. त्यामुळे ही एकंदर गडबड आणि चर्चा पाहता रणबीरची वरात लंडनच्या घरात? हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.