03 March 2021

News Flash

गंमतीत म्हणायला हवे, ‘दीपिकानेच नाक कापले हो….’

तिचे नाक कापण्याची धमकी येते काय आणि चित्रपटाचे नावच बदलले जाते काय?

दीपिका पदुकोण

हे बघा, आपण कायम चित्रपट, त्याचा बरा- वाईट दर्जा व त्याचे यशापयश यावर ‘फोकस’ टाकणारे आहोत. या ‘पडद्याबाहेर’ आपण कशाला उगाच बघा. तर मग ‘पद्मावत’ आपल्याला काय काय दाखवतो हे आपण पाहिलेय, ज्यांनी अजून पाहिले नाही त्यांनी ते नक्कीच जाणून घेतलंय. त्याहीपेक्षा ‘मोठी बातमी’ म्हणजे त्याची देशविदेशातील ‘गल्लापेटीवरील खणखणीत वाटचाल! सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटाचा विक्रम मोडीत निघतोय आणि या यशात याच चित्रपटाला ‘विक्रमी विरोध’ झाला होता ते वातावरण वेगाने निवळतंय. आपल्या चित्रपटसृष्टीला फक्त आणि फक्त यशाचीच चव चाखायला आवडते. त्यात काळानुसार बदल मात्र झालाय. ‘मदर इंडिया ‘, ‘मुगल-ए-आझम’, ‘प्यासा’, ‘गाईड’ यांच्या यशात गुणवत्ता व त्या क्लासिक कलाकृतींचा सामाजिक प्रभाव याची काहीशी गंभीर चर्चा होई व त्यातून अशा चित्रपटांकडे कसे पाहायचे अथवा कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचे याचे अप्रत्यक्ष मार्गदर्शन व्हायचे. आपल्या प्रेक्षकांना ‘चित्रपट कसा पहावा’ याचे धडे नको असतात हे सर्वकालीन सत्य ‘बाहुबली’ (पहिला व दुसरा), ‘टायगर जिंदा है’, ‘पद्मावत’ यांसारख्या चित्रपटांच्या यशाने सिद्ध होते. पण, आता गुणवत्तेपेक्षाही किती दिवसात किती कोटी कमावले हा चित्रपटाच्या यशाचा तराजू वा थर्मामीटर झालाय…

‘पद्मावत’ कशा/ कोणत्या वातावरणात प्रदर्शित झाला हा अनुभव अजूनही ताजाच असला तरी त्याच सगळ्या घडामोडींवर यशाने मात केलीय. हिंदी चित्रपटाच्या इतिहासात ‘पद्मावत’चे सौंदर्य, देखणेपण, दर्जेदार तांत्रिक मूल्ये व विक्रमी यश याचीच नोंद होईल आणि आंदोलकांवर प्रेक्षकांनी मात केली असाच निष्कर्ष निघेल. हे निवडणुकीतील मतपटीसारखे आहे. प्रचारात प्रचंड आघाडीवर असणाराच पक्ष व त्याचा उमेदवार हमखास जिंकेल असेच घडेल असे नसते. मतपेटीतून दिसून येते की मतदारांचा मूड काही वेगळाच होता. त्यानी याच प्रचंड आरडाओरड केलेल्या उमेदवाराचेच डिपॉझिट गुल केलेय. आपल्या देशातील जनता/ मतदार/ प्रेक्षक खूपच सुज्ञ आहेत हो. आता तर ते सोशल मिडियातून हक्काने व्यक्त होतात. अगदी अनेकांनी ‘पद्मावत’ फारसा आवडला नाही, यापेक्षा ‘बाजीराव मस्तानी ‘च चांगला होता यापासून ते ‘संजय लीला भन्सालीच्याच चित्रपटाच्या वेळेसच वाद निर्माण का होतो?’ ‘भन्साली आता पुढचा चित्रपट कोणत्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वावर काढणार’ असेही सडेतोड प्रश्न केलेत. जगातील कोणत्याच चित्रपट कलाकृतीवर शंभर टक्के सकारात्मक मते असूच शकत नाहीत. आजही विविध स्तरावर आपले अस्तित्व दाखवणारा ‘शोले’ न आवडणाराही मोठा वर्ग आहेच.

मोठ्या चित्रपटाच्या यशाची हीच तर मोठी खासियत आहे. ‘तो फार काही ग्रेट चित्रपट नाही. पब्लिकने त्याला इतका का डोक्यावर घेतलाय तेच कळत नाही’, अशी त्यावर एक अत्यंत प्रामाणिक प्रतिक्रियाही असतेच. ‘पद्मावत’मधला खिल्जी वेगळ्याच अर्थाने हीरो झाला. हे कमालीचे चीड आणणारे व विकृत व्यक्तीमत्व. पण रणवीर सिंगच्या मेहनती व आक्रमक अभिनयाला कमालीची दाद मिळतेय. अगदी अशीच दाद ‘शोले’ (१९७५) च्या क्रूर हिंसक निर्दयी गब्बरसिंगच्या बेहतरीन अभिनयासाठी अमजद खानला मिळाली. दोन्हीत काही फरक आहेत. ‘शोले’पूर्वी अमजदची खरी ओळख अभिनेता जयंतचा दुसरा मुलगा (पहिला इम्तियाज) अशी होती. अमजदने ‘शोले’पूर्वी ‘हिन्दुस्तान की कसम ‘मध्ये छोटीशीच भूमिका केली होती. हिंदी रंगभूमीवर त्याचा वावर होता. तात्पर्य चित्रपट रसिकांना हा चेहरा अपरिचित होता. त्या काळात हीरो हा कायमच हीरोचेच कर्तव्य बजावायचा तर खलनायक पडद्यावरची सगळीच पापे करायचा. रणवीर सिंगचा काळ असा कलाकाराला प्रतिमेत वा चौकटीत बसवणारा नाही. आज सतत नवीन आव्हाने स्वीकारणे गरजेचे ठरतयं. प्रेक्षकांनाही तेच हवयं. ते अमक्या कलाकाराने मागील चित्रपटात काय बरे केले होते हे ‘माईंड सेट’ करुन चित्रपट पाह्यला जात नाहीत. शाहिद कपूरबाबत ते फारसं काही बोलत नाहीत.

दीपिका पादुकोणसाठी हा चित्रपट अनेक बाबतीत खूपच महत्त्वाचा हे तुम्हीही जाणताय. ‘पद्मावती’ हे या चित्रपटाचे मूळ नाव म्हणजेच दीपिकाची शीर्षक भूमिका. ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी (ड्रीम गर्ल या चित्रपटाची निर्मिती हेमाची आई जया चक्रवर्ती यांची होती), ‘उमराव जान’- रेखा, ‘चांदनी’- श्रीदेवी अशाच ‘नायिकाप्रधान चित्रपटा’च्या परंपरेत ‘पद्मावती दीपिका’ असेच होते. पद्मावतीचे सौंदर्य व दीपिकाचे सौंदर्य हे वेगळे करता येत नाही. तिच्यासाठी ही ‘लाईफ टाईम’ भूमिका. सजण्या- नटण्यापासून संवाद शैलीपर्यंत तिने ‘पद्मावती’ साकारली. याच नावाने त्रिमिती ट्रेलरच्या वेळेस ओशिवरा येथील एका मल्टिप्लेक्समध्ये दीपिकाच्या एकूणच देहबोलीतून या भूमिका व चित्रपटाबाबतचा विश्वास प्रकर्षाने दिसत होता. तिने या चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीत कसलीही कसर ठेवली नाही हे अनेक कलाकारांनी शिकण्यासारखेच आहे. अशातच तिचे नाक कापण्याची धमकी येते काय आणि चित्रपटाचे नावच बदलले जाते काय? ती ‘स्टार’ असली तरी संवेदनशील व्यक्तीच आहे. या कसोटीच्या काळात ती कोणत्या बरे मन:स्थितीतून गेली असेल हो? कुठेतरी नक्कीच हेलावली असेल.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

मधला अतिशय अवघड काळ कधी बरे संपतोय आणि एकदाचा चित्रपट प्रदर्शित होतोय असे तिला मनोमन वाटले असेलच. त्या एकूणच भयानक गोष्टींना विसरून जावे असाच उत्स्फूर्त प्रतिसाद तिला मिळालाय. तिने घेतलेल्या अथक परिश्रमांचे गोड फळ तिला मिळालेय. यश आत्मविश्वास वाढवते व व्यक्तिमत्व अधिकच खुलवते. दीपिका आता विविध इव्हेंटमध्ये ‘पद्मावत’च्या यशाच्या छान ऐटीत वावरतंय. आपण आपल्या कामातून चोख प्रत्युत्तर द्यावे हा फंडा तिने सिद्ध केलाय. ‘मुगल-ए-आझम’ (१९६०)ची मधुबालाची अजरामर अनारकली तशीच ‘पद्मावत ‘ची दीपिकाची ‘पद्मावती’. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कायमच दखल घेतली जाणार. शंभर कोटींपेक्षा जास्त यश मिळवणारा तिचा हा चक्क सातवा चित्रपट. म्हणजेच गुणवत्ता, सौंदर्य व व्यवसाय अशा तीनही स्तरावर दीपिकाने अनेकांचे नाकच कापले म्हणू या का??

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 11:21 am

Web Title: dilip thakur blog on bollywood movie padmaavat controversy
Next Stories
1 ‘पद्मावत’च्या पारड्यात पहिला पुरस्कार, रणवीरने मारली बाजी
2 ‘पद्मावत’वर इस्लाम धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप
3 मुंबईतील व्यावसायिकावर झीनत अमान यांना धमकावण्याचा आरोप
Just Now!
X