नावात काय आहे असे म्हटले जाते. पण, नावातचं सर्व काही असतं हे रवीने प्रसिद्ध केलेल्या पोस्टरमुळे दिसून आलेयं. आपल्या चित्रपटाची जाहिरात कशी करावी, हे दिग्दर्शक रवी जाधवला चांगलेच माहित आहे. मराठी चित्रपटसृष्टीला दमदार चित्रपट देणा-या दिग्दर्शकांमध्ये रवीचे नाव घेतले जाते. ‘बालगंधर्व’, ‘नटरंग’, ‘बीपी’, ‘मित्रा’ या चित्रपटांमधून त्याने वेगवेगळे विषय हाताळले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा नवीन विषय हाताळण्यास तो सज्ज झाला आहे.
फेसबुकवर रवीने नुकतीचं एक पोस्ट टाकली होती. त्याने एक पोस्टर टाकले असून चित्रपटाचे नाव न्यूड असे आहे. पेन्टिंग स्वरुपात असलेल्या या पोस्टरवर मुलीचा चेहरा दिसतो. मात्र, चित्रपटातील कलाकार कोण असतील याबाबतची माहिती अद्याप त्याने दिलेली नाही. “बॅंजो या माझ्या पहिल्या हिन्दी सिनेमाची तयारी जोरात चालू आहे. पण त्याच बरोबर मी दिग्दर्शित करीत असलेल्या माझ्या पुढच्या मराठी चित्रपटाचे कामही गेल्या ८-९ महिन्यांपासून सुरु आहे. नाव पाहिल्यावरच तुमच्या लक्षात येईल की विषय वेगळा आहे, काम कठीण आहे पण म्हणूनच ते करायचा हा एक प्रयत्न आहे. सादर आहे माझ्या पुढच्या मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर…,” असे रवीने फेसबुकवर प्रसिद्ध केलेले आहे.चित्रपटाच्या नावामुळे आपल्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण करण्यास नक्कीच रवीला यश आले आहे असे म्हणण्यास हरकत नाही.